एक्स्प्लोर
नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघे अटकेत
अट्टल गुन्हेगार असलेल्या या दोघांनी तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून लुटलं आहे. आता ते पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत.

मुंबई : नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफश केला आहे. या टोळीतील दोघांना बेड्या ठोकल्या असून इतर आरोपी पसार झाले आहेत. या टोळीने आतापर्यंत दीडशेहून अधिक तरुणांना गंडवलं आहे. भगीरथ त्यागी आणि झाकिर हुसेन असं अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत. अट्टल गुन्हेगार असलेल्या या दोघांनी तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून लुटलं आहे. आता ते पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. या ठकसेनांनी एक कॉल सेंटरही उघडलं होतं. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना ते एका तरुणीद्वारे कॉल करत असत. मुलाखती, परदेश वारीसाठी तिकीटाच्या नावावर तरुणांकडून पैसे तर घ्यायचे परंतु त्यांना नोकरी मिळवून द्यायचे नाहीत. एका तरुणाने याबाबत मुंबईच्या पायधुनी पोलिसात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली. आतापर्यंत जवळपास 150 पेक्षा जास्त तरुणांना गंडा घातल्याचा संशय आहे. मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात त्यांचं हे जाळं पसरलं होतं. या टोळीपैकी दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले असले तरी त्यांचे अनेक सहकारी अजूनही पसार आहेत. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी आपली मोहीम वेगाने सुरु केली आहे.
आणखी वाचा























