Mumbai News Update : नवी मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी पैसे घेवून आलेल्या गाडीचा चालकच पैसे घेवून फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबईतील उलवे येथील एटीएम (ATM ) मशीनमध्ये भरण्यासाठी आणलेले पैसे घेवून हा चालक फरार झाला आहे.  संदीप दळवी असे या चालकाचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 


नवी मुंबईमधील उलवे सेक्टर 19  येथील बँक ॲाफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी संदीप दळवी हा व्हॅनसह आला होता. यावेळी पेटीत एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली दोन कोटी रूपयांची रक्कम होती. यातील एक कोटी 18 लाख रूपये पेटीतून काढून बॅंकेचे कर्मचारी एटीएममध्ये भरण्यासाठी गेले. कर्मचारी एटीएममध्ये पैसे भरत असताना व्हॅनमध्ये संदीप हा एकटाच होता. याच गोष्टीचा फायदा घेत दळवी याने व्हॅन घेवून तेथून पळ काढला. एटीएममध्ये पैसे भरत असताना कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी आजूबाजूला संदीप याचा सोध सुरू केला. परंतु, एटीएमच्या आसपास तो कोठेच आढळून आला नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले.   


पेटीमधील रक्कमेतील दोन कोटींमधील एक कोटी 18 लाख रूपये एटीएममध्ये भरण्यासाठी काढल्यानंतर  गाडीत 82 लाख रूपये शिल्लक होते. संशयित आरोपी संदीप दळवी याने उलवे येथून गाडी सीबीडी येथील अपोलो हॅास्पीटल जवळ आणून ती तिथेच सोडून दिली आणि गाडीतील 82 लाख रूपये घेऊन तो फरार झाला आहे. एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी मोठी रक्कम आणली जाते. त्यामुळे या गाडीसोबत सुरक्षा रक्षकही असतात. परंतु, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यात धूळ फेकून गाडीच्या चालकानेच ही रक्कम पळवल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  


दरम्यान, या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात दळवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून  सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. 


महत्वाच्या बातम्या