Amit Fakkad Gawate Profile: समीर वानखेडे यांच्या गच्छंतीनंतर मुंबई एनसीबीची धुरा कुणाच्या खांद्यावर जाणार याची चर्चा होती. अखेर एनसीबीच्या मुंबई विभागीय संचालकपदी (NCB Zonal Director) नवी नियुक्ती झाली आहे. 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी अमित घावटे एनसीबीच्या मुंबई विभागाचे नवे संचालक असणार आहेत. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून मुंबई एनसीबी वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाचं घावटे यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
कोण आहेत अमित फक्कड घावटे
एनसीबीच्या मुंबई झोनल डायरेक्टर पदावरून वादग्रस्त समीर वानखेडेंना हटवण्यात आल्यावर त्यांच्याजागी अमित घावटे यांची नियुक्ती करण्यात आलीय. अमित फक्कड घावटे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी असून त्यांनी याआधी एनसीबीमध्ये काम केलंय.
अमित घावटे हे मुळचे पुणे जिल्ह्यातील शिरूरचे आहेत.
अमित घावटेंचे वडील फक्कडसिंह घावटे हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचं शिरुरमधे क्लिनिक होतं.
तर अमित घावटेंच्या आई सुमन घावटे या शिरुर विकास आघाडीकडून शिरुर नगरपरिषदेत नगरसेविका म्हणून देखील निवडून आल्या होत्या.
अमित घावटेंचं चौथीपर्यंत शिक्षण शिरुर नगरपरिषदेच्या शाळेत झालं असून पाचवी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण शिरुर मधील विद्याधाम प्रशालेत झालंय.
त्यानंतर त्यांनी पुण्यातुन आर्किटेक्चरची पदवी प्राप्त केली.
मात्र पदवीनंतर ते स्पर्धा परीक्षेची तयारी करु लागले आणि 2008 ला ते युपीएससी मार्फत भारतीय महसूल विभाग अर्थात आयआरएसमध्ये दाखल झाले.
एनसीबीच्या केंद्रीय कार्यालयातून एक पत्रक जारी करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. तीन अधिकाऱ्यांच्या निवडीचं हे पत्र आहे. यात अमित घावटे यांची झोनल डायरेक्टर बंगळुरु आणि चेन्नईमधून मुंबई झोनल डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे बंगळुरु झोनल युनिटचा अतिरिक्त कार्यभार देखील असणार आहे. घावटे यांच्यासह आणखी दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही या पत्रात उल्लेख आहे. यामध्ये अमनजितसिंह यांची चंदीगढ एनसीबी झोनल डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे तर ग्यानेंद्रकुमार सिंह यांची झोनल डायरेक्टर दिल्ली इथं नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
Aryan Khan Drugs case : आरोपपत्र दाखल करण्यासाठी NCB SIT ने मागितला 90 दिवसांचा अवधी
NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल