Wardha News Update : वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कौटुंबिक वादातून पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घालून पतीने आत्महत्या केली आहे. आष्टी शहरातील इंदिरा नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून आरोपी पतीचा शोध सुरू असताना त्याने शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मंगला सुरेश चांगोले (वय, 38 ) असे जखमी पत्नीचे नाव आहे. तर सुरेश रामचंद्र चांगोले ( वय, 40 ) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.  


मंगला चांगोले आणि सुरेश यांच्यात घरगुती कारणातून सतत वाद होत असत. सोमवारी सकाळी दहा वाजण्यच्या सुमारास त्यांच्यात नेहमीप्रमाणे वाद सुरू झाला. या वादातून सुरेश याने कुर्‍हाडीने पत्नीच्या डोक्यात दोन घाव घातले. यात ती गंभीर जखमी झाली. स्थानिकांनी जखमी अवस्थेत मंगला यांना उपचारासाठी नागपूर येथील रूग्णालयात दाखल केले आणि या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली.


या घटनेनंतर जखमी महिलेचे भाऊ अंकुश काशिनाथ राऊत यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून संशयित पतीचा पोलिसांनी शोध सुरू केला. आरोपीचा शोध सुरू असताना तळेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मौजा भारसवाडा येथील शेतात त्याने झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. जखमी महिलेवर नागपूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 


महत्वाच्या बातम्या