Bandra Worli Sea Link Accident : वांद्रे वरळी सी लिंकवर भीषण अपघात, पक्षाला वाचवण्यासाठी थांबलेल्या दोघांना टॅक्सीनं चिरडलं
Bandra Worli Sea Link : अपघाताचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. भरधाव वेगाने आणि बेजबाबदारपणे वाहन चालवल्याप्रकरणी टॅक्सी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bandra Worli Sea Link Accident News : मुंबईमधील (Mumbai) वांद्रे वरळी सी लिंकवर भीषण अपघात झालाय. पक्षाला वाचवण्यासाठी कारमधून खाली उतरलेल्या दोघांना टॅक्सीने चिरडले आहे. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अमर मनीष जरीवाला असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जरीवाला यांचा चालक श्याम सुंदर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अमर जरीवाला हे व्यावसायिक आपल्या कारने सी लिकंवरून मालाडला निघाले असताना त्यांच्या कारने एक पक्षी जखमी झाला. त्यामुळे या पक्षाला वाचवण्यासाठी जरीवाला आपल्या चालकासह कारमधून खाली उतरले. त्यावेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या टॅक्सीने त्या दोघांनाही जोराची धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यामुळे उपचारासाठी दोघांना रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असताना जरीवाला यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या चालकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात 30 मे रोजी झाला आहे. परंतु, या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज नुकतेच समोर आले आहे. त्यामुळे ही घटना उघड झाली आहे.
अपघाताचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. भरधाव वेगाने आणि बेजबाबदारपणे वाहन चालवल्याप्रकरणी टॅक्सी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी टॅक्सी चालकाला अटक केली आहे.
थरकाप उडवणारा 16 सेकंदाचा व्हिडीओ
या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज फक्त 16 सेकांदाचेच आहे. परंतु, हा व्हिडीओ काळजाचा थरकाप उडवणारा आहे. अमर जरीवाला हे पक्षाला काय झाले हे पाण्यासाठी आपली कार बाजूला घेऊन थांबले होते. त्यामुळे काही वाहने वेग कमी करून बाजूने निघून जात आहेत. परंतु, याच दरम्यान एक टॅक्सी भरधाव वेगात येते आणि जरीवाला व त्यांच्या चालकाला जोराची धडक देते. यात दोघेही हवेत उडून खाली पडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. तेथून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी दोघांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असताना जरीवाला यांचा मृत्यू झाला.