(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पश्चिम रेल्वेवर 11, 12 मार्च रोजी 'ब्लॉक'; अंधेरीतील गोखले पुलावरील गर्डरच्या कामासाठी गाड्या रद्द
Andheri Gokhale Bridge: पश्चिम रेल्वेवर 11 आणि 12 मार्च रोजी 'ब्लॉक' घेण्यात येणार असून अंधेरीतील गोखले पुलावरील गर्डरच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहेत.
Andheri Gokhale Bridge: लोकल ट्रेननं दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज (शनिवारी) अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वेवर (Western Railway) शनिवारी रात्री अंधेरीतील गोखले पुलाचे गर्डर्स काढून टाकल्यामुळे नियोजित गाड्या रद्द करून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानंतर, मुंबई महानगरपालिका (BMC) रेल्वे-ओव्हर-ब्रिज (ROB) पुनर्बांधणीचे काम हाती घेईल. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
पश्चिम रेल्वेवरील विलेपार्ले आणि अंधेरी स्थानकादरम्यान शनिवारी रात्री 9.30 ते रविवारी पहाटे 5.30 वाजेपर्यंत 'ब्लॉक' घेण्यात येणार आहे. गोखले पुलासाठी स्टील गर्डरची उभारणी करण्यासाठी यादरम्यान रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. या कामासाठी अनेक लोकल रद्द करण्यात आल्या तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. अंधेरीतील धोकादायक गोखले पुलाचं पाडकाम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. या पुलाचं पाडकाम करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं आज शनिवारी, 8 तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजता सुटणारी विरार-चर्चगेट ही शेवटची जलद लोकल असणार आहे. तर बोरिवलीहून चर्चगेटसाठी स्लो लोकल रात्री 11.34 वाजता सुटणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मेगा ब्लॉकचा हा शेवटचा टप्पा आहे. जिथे रेल्वे आरओबीच्या पूर्वेकडील उर्वरित दोन गर्डर काढणार आहे. या कालावधीत 15 लोकल ट्रेन रद्द करण्यात येणार आहेत. याबाबत अधिक माहिती देताना अधिकाऱ्यानं सांगितलं की, विलेपार्ले ते अंधेरी दरम्यानची पाचवी लाईन आणि प्लॅटफॉर्म 9 शनिवारी रात्री 9:30 ते रविवारी पहाटे 5:30 पर्यंत बंद राहणार आहे.
इतर मार्ग जाणून घ्या
प्लॅटफॉर्म क्रमांक चार सकाळी 12.10 ते पहाटे 4.40 पर्यंत बंद राहणार आहे. सुमित ठाकूर, मुख्य पीआरओ, पश्चिम रेल्वे यांनी माहिती दिली आहे की, सकाळी 12:10 ते दुपारी 4:40 पर्यंतच्या ब्लॉक दरम्यान, गोरेगावपर्यंत नियोजित लोकल सेवा धावतील. गोरेगाव ते चर्चगेट हार्बर मार्गावरून प्रवासी प्रवास करू शकतात. गोरेगाव स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 1 आणि 2 वरून अतिरिक्त सेवा सुरू होतील. विरार ते चर्चगेट दरम्यानची शेवटची जलद लोकल रात्री 11.15 वाजता सुटेल. वसई रोडवरून अंधेरीकडे जाणारी शेवटची स्लो लोकल रात्री 11.15 वाजता सुटेल.
दरम्यान, अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पश्चिम उपनगरातील वाहतुकीच्या दृष्टीनं गोखले ब्रिज अत्यंत महत्त्वाचा. वाहतुकीसाठी धोकादायक झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. नागरिकांना वाहतूक कोंडीत ढकलल्यानंतर मुंबई महापालिका आणि पश्चिम रेल्वे प्रशासन यांच्यात ब्रिजच्या रेल्वे लाईनवरील भाग कोण पाडणार? यावर 'तू तू मैं मैं' करायला सुरुवात झाली होती. गोखले ब्रिज बंद करत असताना मुंबई महापालिकेनं या ब्रिजचा पश्चिम रेल्वे लाईनवरील भाग पाडण्याची तयारी करावी, या आशयाचं पत्र पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिलं होतं. त्यावर या संपूर्ण ब्रिज पाड काम हे मुंबई महापालिका करणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. अखेर याप्रकरणी एक सुवर्णमध्य काढत ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आली आहे.