Mumbai Milk Rate: मार्च महिन्याची सुरुवात महागाईने; सिलेंडर पाठोपाठ दुधाच्या दरांमध्येही वाढ
आता सिलेंडरच्या पाठोपाठ दुधाच्या दरांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. मुंबईमध्ये (Mumbai) दूध हे पाच रुपयांनी महागले आहे.
![Mumbai Milk Rate: मार्च महिन्याची सुरुवात महागाईने; सिलेंडर पाठोपाठ दुधाच्या दरांमध्येही वाढ Mumbai milk price hike by 5 rupees per litre from 1 march 2023 know rate Mumbai Milk Rate: मार्च महिन्याची सुरुवात महागाईने; सिलेंडर पाठोपाठ दुधाच्या दरांमध्येही वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/52cfed13d7f2c13b558855cd53e3d3e81677656197760259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Milk Rate : दर महिन्याला आर्थिक बाबतीत काही बदल होत असतात. मार्च महिन्यात सुद्धा काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. ज्याचा परिणाम दैनंदिन जीवनात दिसून येणार आहे. मार्च (March) महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा (Inflation) मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. आता सिलेंडरच्या पाठोपाठ दुधाच्या दरांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. मुंबईमध्ये (Mumbai) दूध हे पाच रुपयांनी महागले आहे.
मुंबई दूध उत्पादक संघाने MMPA दुधाचे नवे दर जाहीर केले आहे. आता मुंबईत म्हशीचे 1 लिटर दूध विकत घेण्यासाठी आता 85 रुपये मोजावे लागतील. आतापर्यंत एक लिटर म्हशीचे दूध 80 रुपयांना मिळत होते. हे नवीन दर 31 ऑगस्ट 2023 पर्यंत राहणार आहेत. त्यानंतर असोसिएशन पुन्हा एकदा दुधाच्या किंमतींबाबत माहिती देईल. सप्टेंबर 2022 नंतर मुंबईतील दुधाच्या दरात झालेली ही दुसरी मोठी वाढ आहे. एमएमपीएचे कार्यकारी समितीचे सदस्य सीके सिंह यांनी सांगितलं, दुभत्या जनावरांच्या खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमतीची भरपाई करण्यासाठी ही दरवाढ आवश्यक आहे. या खाद्यपदार्थांच्या किंमतींमध्ये गेल्या काही महिन्यात 15 ते 25 टक्के वाढ झाली आहे.
पनीर, चहा यांच्याही किंमती वाढणार?
चहा, मिल्कशेक, पनीर, मिठाई इत्यादी दुधापासून तयार करण्यात येणाऱ्या किंमतींमध्ये देखील वाढ होऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे. एमएमपीएचे कोषाध्यक्ष अब्दुल जब्बार छावनीवाला यांनी सांगितलं की, दुधाचे दर वाढल्यानं चहा, कॉफी, मिल्कशेक यांच्या दरांमध्ये देखील वाढ होऊ शकते. मार्च महिन्यामध्ये होळी, रंगपंचमी यांसारखे सण आहेत. या सणांमध्ये लोक दुधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ तयार करतात. आता दुधाच्या किंमती वाढल्यानं सर्वसमान्य जनतेच्या खिशाला मोठा फटका बसला आहे.
सिलेंडरचे दर देखील वाढले
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आता 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 2119.50 रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांवर पोहोचला आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.
VIDEO : Mumbai Milk Rate Hike : मुंबईत सुट्टं दूध 5 रुपयांनी महागलं, आजपासून नवे दर लागू
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)