Mumbai Local Train : लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत, मध्य रेल्वेचे अप आणि डाऊन मार्ग सुरू
Mumbai Local Train Service Update : मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला होता. भांडुप आणि कुर्ला स्टेशनला रेल्वे ट्रकवर पाणी साचल्याने ठाण्यापासून पुढे मध्य रेल्वेची लोकलसेवा बंद करण्यात आली होती.
Mumbai Local Train Service Update : कामावरून घरी जाणाऱ्या मुंबईतील कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी असून मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील वाहतूक आता पुन्हा सुरू झाली आहे. मध्य रेल्वेवर ठाण्यापासून पुढे पाणी साचल्यामुळे ठप्प झालेली लोकल आता पुन्हा सुरू झाली असून या मार्गावरील स्लो आणि फास्ट, अप आणि डाऊन दिशेने वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.
मध्य मार्गावरील वाहतूक सुरू (Mumbai Central Line Update)
मुंबईत रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने जागोजागी पाणी साचल्याचं दिसून आलं. त्याचा परिणाम हा रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर झाला. मात्र आता पाणी ओसरल्याने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे. कुर्ला आणि सायन दरम्यान साचलेले पाणी ओसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. स्लो आणि फास्ट अशा दोन्ही मार्गावरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक सुरू झाली आहे. सीएसएमटी ते ठाणे, ठाणे ते कर्जत आणि कसारा अशी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील सुरू असून ती थोड्या उशिराने आहे.
चुनाभट्टी येथील पाणी कमी झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक देखील सुरू झाली आहे. चुनाभट्टी ते पनवेल आणि पनवेल ते सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा पुन्हा सुरू झाली आहे. हार्बर मार्गावरची रेल्वेवाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत हार्बरवरच्या लोकलला ब्रेक लागला होता.
कुलाब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचले
यशवंतराव चव्हाण सेंटरपासून कुलाब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे. सतत पडलेल्या पावसामुळे नाले तुंबले असल्याने रस्त्यावर पावसाचे पाणी आले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा महाराष्ट्र सरकारचे मोठे प्रशासकीय अधिकारी राहतात. तसेच या रस्त्यावर मंत्री छगन भुजबळ यांचे शासकीय निवासस्थानदेखील आहे. अगदी त्याच रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाल्याने महापालिकेच्या नाले सफाईची पोलखोल झाली आहे.
सकाळपासून पाऊस सुरू असल्याने लोकल वाहतूक सेवा कोलमडली होती. त्यामुळे काही एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक थांबवली होती किंवा त्याचं ठिकाण बदलण्यात आलं होतं. मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्याने वाहतूक पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
संध्याकाळचा वेळ हा लोकल सेवेसाठी पीक पिरिएड असल्याने यावेळी वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुन्हा पावसाचा जोर लक्षात घेता प्रवाशांनी लवकरात लवकर घरी जावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
ही बातमी वाचा: