Mumbai Local Titwala : चाकरमान्यांनो लक्ष द्या... मध्य रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिरानं, टिटवाळा अपघाताचा परिणाम मुंबई लोकलवर कायम
शुक्रवारी रात्री टिटवाळा (Titwala Accident) येथून मुंबईतल्या सीएसएमटीच्या दिशेनं जाणाऱ्या एका लोकलचे डबे रुळावरुन घसरल्याची माहिती मिळत आहे. कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर ही घटना घडली.
Mumbai Local Titwala Update: मुंबई : मुंबई लोकल (Mumbai Local) म्हणजे, चाकरमान्यांची लाईफलाईन. पण, हीच लाईफलाईन विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी रात्री टिटवाळा (Titwala Accident) येथून मुंबईतल्या सीएसएमटीच्या दिशेनं जाणाऱ्या एका लोकलचे डबे रुळावरुन घसरल्याची माहिती मिळत आहे. कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर ही घटना घडली. रुळावरुन घसरलेले डबे बाजूला काढण्याचं काम पूर्ण झालं आहे. पण, त्याचा परिणाम मात्र लोकल वाहतुकीवर झाला आहे.
शुक्रवारी रात्री कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल दिवा स्थानकाजवळ थांबवण्यात आल्या होत्या. रात्री झालेल्या याच अपघाताचा परिणाम आज सकाळच्या लोकल वाहतुकीवरही दिसून येत आहे. शनिवारी पहाटेपासूनच मुंबईकडे जाणाऱ्या लोकल पाच ते दहा मिनिटं उशिरानं धावत आहेत. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या लोकल 5 ते 10 मिनिटं उशिरानं
कल्याणजवळ टिटवाळा लोकलचा डब्बा रुळावरून घसरल्याची घटना रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान घडली होती. तब्बल तीन तासाहून अधिक काळ लोकलला रुळावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू होतं. या घटनेमुळे अप आणि डाऊन गाड्यांवर परिणाम झाला आहे.
दरम्यान, दिवा डोंबिवली ठाकुर्ली दरम्यान लोकलच्या रांगा लागल्या होत्या. अनेक प्रवासी लोकलमध्ये अडकून पडले होते. तब्बल तीन तासांहून अधिक काळानंतर लोकल सुरू झाल्या. मात्र, सध्या लोकल वाहतूक सुरळीत असून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल पाच ते दहा मिनिटं उशिरानं धावत आहेत.