एक्स्प्लोर
रेल्वेच्या धडकेत जखमी व्यक्तीची 6 तास मृत्यूशी झुंज, मृतदेह लोकलमधून नेला
कोकणकन्या एक्स्प्रेसच्या धडकेत रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास दिवा ते तळोजा स्थानकादरम्यान व्यक्ती गंभीर जखमी झाली.

मुंबई : रेल्वे प्रशासनाच्या मुर्दाडपणामुळे एका व्यक्तीचा हकनाक बळी गेल्याची घटना दिवा ते तळोजादरम्यान घडली आहे. रुग्णवाहिकेअभावी जखमी व्यक्तीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे या व्यक्तीच्या मृतदेहाची दिवा-ठाणे लोकलमधून फरफट करण्यात आली. कोकणकन्या एक्स्प्रेसच्या धडकेत रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास दिवा ते तळोजा स्थानकादरम्यान व्यक्ती गंभीर जखमी झाली. ही माहिती दिवा स्टेशनला पोहोचेपर्यंत रात्रीचे अडीच वाजले. मात्र घटनेची माहिती मिळाल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने रात्री 2.30 ते सकाळी 6.30 वाजेपर्यंत काहीच हालचाल केली नाही. एवढ्या रात्री घटनास्थळी जाण्यासाठी अॅम्ब्युलन्सच उपलब्ध नसल्याचं कारण रेल्वेकडून देण्यात आलं. त्यामुळे उपचाराअभावी या व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतरही त्या व्यक्तीच्या मृतदेहाची परवड सुरुच राहिली. कारण सकाळी सहा वाजता दिव्यातून जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला इमर्जन्सी हॉल्ट देऊन हमाल आणि रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तिथे मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा दिवा स्थानकात परत येण्यासाठी रोहा-दिवा पॅसेंजरची वाट पाहिली. अखेर सकाळी साडेआठ वाजता मृतदेह दिवा स्थानकात आणला. यानंतर दिवा-ठाणे लोकलच्या भर गर्दीतून हा मृतदेह ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. केवळ अॅम्ब्युलन्स नसल्याचं कारण देत या व्यक्तीची तब्बल तास मृत्यूशी झुंज सुरु होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या या मुर्दाडपणावर सर्वत्र टीकेची झोड उठत आहे.
आणखी वाचा























