(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई आयआयटीत राष्ट्रविरोधी घोषणा दिल्यास कारवाई होणार, हॉस्टेलची नवी नियमावली
जेएनयू आणि अलीगड विद्यापीठातील वादानंतर मुंबई आयआयटीने विद्यार्थ्यांनासाठी नवी नियमावली जारी केली आहे. ही नियमावली पाळणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे.
मुंबई : मुंबई आयआयटी हॉस्टेलचे नवे नियम आयआयटी प्रशासनाने विद्यार्थ्यांना पाळण्यास सांगितले आहेत. यामध्ये एकूण 15 नियमांची नियमावली हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात आली आहे. हे नियम काटेकोरपणे पाळले जावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (JNU) आणि अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी (AMU)मध्ये झालेल्या वादानंतर त्यासोबतच नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी विरोधातील आंदोलनाचे पडसाद मागील काही दिवसांपासून मुंबई आयआयटीमध्ये पडत होते. या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईमध्ये बुधवारी हॉस्टेलचे नवे नियम जारी करण्यात आले आहेत.
या नव्या नियमांतर्गत विद्यार्थ्यांना राष्ट्रविरोधी आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांपासून दूर राहिलं पाहिजे, असं सांगण्यात आलं आहे. तसेच कॅम्पसमध्ये परवानगीशिवाय कोणतेही पोस्टर अथवा पॅम्प्लेट वाटले जाऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आयआयटी बॉम्बेनं नव्या नियमांतर्गत कॅम्पसमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांना समाजकंटकांवर कारवाई करण्याची पूर्णतः सूट दिलेली आहे. 15 नियमांची नियमावली जारी करण्यात आली असून, यामध्ये नियम क्रमांक 1 आणि क्रमांक 10 नुसार कॅम्पसमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी राष्ट्रविरोधी, समाजविघातक कृत्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ही नियमावली स्टुडंट्स अफेअर्स असोसिएटचे डीन प्रोफ्रेसर जॉर्ज मॅथ्यू यांनी जारी केली आहे.
मागील आठवड्यात विद्यार्थ्यांच्या एका गटाने संस्थेच्या संचालकांना एक पत्र लिहिलं होतं. ज्यामध्ये जे वातावरण आयआयटी मुंबई परिसरात निर्माण झालं होतं त्याबाबत त्यांनी तक्रार करून राजकीय वातावरण निर्माण आयआयटी मुंबईमध्ये होऊ नये, अशी मागणी केली होती. त्यानंतर आत्ता आयआयटीचे हे नवे नियम हॉस्टेल आणि आयआयटी परिसरात पाळावे लागणार आहे.