Mumbai Crime News : दारू पिण्यावरून राडा; मालवणी परिसरात तरुणाची जमावाकडून हत्या, पोलिसांवरही हल्ला
Mumbai Crime : दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून एकाची हत्या झाली. जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला.
मुंबई : मुंबईच्या (Mumbai) मालाड (Malad) मालवणी (Malvani) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबोजवाडी परिसरातील एका जमावाकडून तरुणाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला असून मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर देखील जमावाकडून हल्ला करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे.
दारू पिण्यावरून वाद
आरोपी आणि मृत तरुण हे दोघेही शेजारी राहणारे आहेत. आरोपी गोविंद चव्हाण आणि उज्जा चव्हाण हे शेजारी राहतात. या दोघांमध्ये दारू पिण्यावरून किरकोळ वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असल्याची माहिती आहे. या हाणामारीत उज्जा चव्हाण हा गंभीर जखमी झाला. जमावाकडून होत असलेल्या बेदम मारहाणीत उज्जाचा जागेवरच मृत्यू झाला. मारहाण करणाऱ्या जमावामध्ये महिलांचाही समावेश होता. विशेष म्हणजे, मारहाणीची घटना सुरू असताना अनेक बघ्यांची गर्दी होती. मात्र, कोणीही मारहाणीला रोखण्याचा प्रयत्न केला नाही.
वाद सोडवण्यास गेलेल्या पोलिसांवरच हल्ला
या मारहाणीची माहिती पोलिसांना कळवण्यात आली होती. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मालवणी पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील जमावाकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी जमावा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी गोविंद चव्हाण या आरोपीस अटक केली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. दरम्यान, मालवणी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दिवाळीच्या दिवशीच पतीने पत्नीला संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील मन सुन्न करणारी घटना
दिवाळीच्या दिवशीच पतीने पत्नीची गळा दाबून हत्या (Murder) केल्याची घटना समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील कापूसवडगाव येथे ही घटना घडली असून, या प्रकरणी मयत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासू-सासू विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती संतोष थोरात असे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर, संतोष दिनकर थोरात (वय 36 वर्ष), दिनकर माणिकराव थोरात (वय 60 वर्ष), रंजना दिनकर थोरात (वय 50 वर्ष) असे आरोपींचे नावं आहे.