Mumbai Crime : पत्नीच्या चारित्र्यावर संशय, आधी मुलीची हत्या, मग स्वत:ला संपवलं; मुंबईतील धक्कादायक घटना
Mumbai Crime : पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता म्हणून एका बापाने 11 वर्षांच्या मुलीची हत्या केली आणि मग स्वतःचं जीवन संपवलं. मुंबईच्या लालबाग परिसरात ही घटना घडली आहे.
Mumbai Crime : मुंबईतून (Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता म्हणून एका बापाने 11 वर्षांच्या मुलीची हत्या केली आणि मग स्वतःचं जीवन संपवलं. मुंबईच्या लालबाग (Lalbaug) परिसरात ही घटना घडली आहे. भूपेश पवार असं मृत बापाचं नाव आहे. तर आर्या पवार असं हत्या झालेल्या अकरा वर्षीय मुलीचं नाव आहे.
आधी मुलीची हत्या, मग स्वत: गळफास
भूपेश पवार याला कायम आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. मंगळवारी (25 एप्रिल) पत्नी बाहेर गेली असता, भुपेशने आपल्या 11 वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर स्वतःला गळफास लावून घेतला. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरुन काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये भादंविच्या कलम 302 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पती आणि मुलगी मृतावस्थेत आढळले
मृत भूपेश पवार (वय 42 वर्षे) हा शेअर ब्रोकर म्हणून काम करायचा. तर त्याची पत्नी एका खासगी कंपनीत डेटा ऑपरेटर म्हणून काम करते. गणेश गल्लीतील विमावाला महल या इमारतीच्या सोळाव्या मजल्यावर पती, पत्नी आणि मुलगी राहत होते. काल रोजच्याप्रमाणे पत्नी तिच्या कामावर गेली. परंतु सकाळी अकराच्या सुमारास तिने पती भूपेश पवारला अनेक फोन केले. परंतु त्याने एकही कॉल रिसिव्ह केला नाही. संशयास्पद वाटल्याने पत्नीने घराकडे धाव घेतली. घरचा दरवाजा आतून बंद होता. यानंतर तिने शेजाऱ्यांना कळवलं आणि काळाचौकी पोलीस स्टेशन गाढलं. यानंतर पोलीस तातडीने घराजवळ पोहोचले. दरवाजा तोडल्यानंतर त्यांना भूपेश पवार आणि आणि मुलगी दोघेही लटकलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी दोघांना केईएम रुग्णालयात दाखल केलं असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
माझा पैसा, सोनं, घर भाच्याला द्या, सुसाईड नोटमध्ये उल्लेख
दरम्यान पोलिसांना त्याच्या घरात सुसाईड नोट देखील सापडली आहे. यात त्याने लिहिलं आहे की, पत्नीसोबत झालेल्या वादामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचं नमूद केलं आहे. आपल्यानंतर मुलीची फरफट होऊ नये असंही त्याने लिहिलं आहे. तसंच माझा पैसा, सोनं आणि घर माझ्या भाच्याला द्यावं. इतकंच नाही तर भूपेश पवार याने आत्महत्या करण्यापूर्वी घरातील 9 ते 10 तोळं सोनं आणि 9 लाख रुपयांची रोख रक्कम काढून जमिनीवर ठेवली होती. सुसाईड नोटमध्ये हा ऐवज आपल्या भाच्याला देण्याचा उल्लेख केला आहे.
दरम्यान भूपेशला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याचे आणि पत्नीचे कायम वाद व्हायचे. काल देखील दोघांमध्ये वाद झाले होते, त्यात भूपेशने आपला फोन फेकून दिला होता, जो शेजाऱ्यांनी त्याला परत आणून दिला.