मुंबई: मरिन ड्राईव्हजवळील मुलींच्या हॉस्टेलमध्ये बलात्कार करुन एका मुलीची हत्या करण्यात आल्यानंतर त्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटना घडल्यानंतर 24 तासांच्या आतच इतर मुलींनी ही जागा सोडल्याचं चित्र आहे. 


बुधवारी घडलेल्या घटनेनंतर हॉस्टेलमध्ये वास्तव्यास असलेल्या जवळपास सर्व विद्यार्थीनीनी जागा सोडणं पसंत केलंय. या घटनेला 24 तासही उलटून गेले नाहीत, तरीही सर्वच मुलींनी हे हॉस्टेल सोडल्याचं चित्र आहे. त्यामुळे या हॉस्टेलमध्ये भयानक शांतता असल्याचं दिसून येतंय. 


हॉस्टेलचा कारभार भोंगळ, त्यामुळेच मुलीचा जीव गेला; आई-वडिलांची तक्रार


पीडितेच्या आई वडिलांनी पोलिसांसह या वसतिगृहात जाऊन पाहाणी केली. आमच्या मुलीनं त्या ठिकाणी घडत असलेल्या परिस्थितीची कल्पना दिली होती, आम्ही तिला रितसर तक्रार करण्यास सांगितलं होतं. पण इथला कारभार इतका भोंगळ होता की कशाला कशाचा पत्ता नव्हता. आमची मुलगी तर गेली, पण तिला न्याय मिळाला पाहिजे हीच अपेक्षा आहे असं त्या मुलीच्या आई-वडिलांनी म्हटलं आहे.


Marine Line Hostel Girl Murder Case: काय आहे प्रकरण?


मरीन ड्राईव्हजवळील असलेल्या एका वसतिगृहात 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी (Marine Drive Police) घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. बुधवारी सायंकाळी वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर मृतदेह आढळून आला. सूत्रांनी सांगितले की या मुलीची हाताने गळा दाबून हत्या (Marine Line Hostel Girl Murder) करण्यात आली आहे. या प्रकरणात वसतिगृहाच्या वॉचमनवर संशय होता आणि तो सकाळपासून बेपत्ता होता. ही हत्या झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच, बुधवारी रात्री त्या वॉचमनचा मृतदेह आढळला. या वॉचमनचा मृतदेह हा चर्नी रोड पोलिस स्टेशनच्या (Charni Road Murder) जवळ असलेल्या रेल्वे ट्रॅकवर मिळाला. या वॉचमनचे नाव ओमप्रकाश कनौजिया असं असून त्याचं वय 53 वर्षे असल्याचं सांगण्यात येतंय.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पीडितीचा शरीरावर जखमही होती. पोलिसांनी जेजे रुग्णलयात मृतदेह पाठवला होता. त्याचसोबत मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात ही घटना सोमवारी रात्री 11.30 ते मंगळवारी पहाटे 4.45 च्या दरम्यान घडली होती. पीडित मुलीचा मैत्रिनीने तिला रात्री 11:30 वाजता शेवटचे पाहिले होते.


वसतिगृहातील सीसीटीव्हीमध्ये आरोपी ओमप्रकाश कनोजिया हा पहाटे 4:44 वाजता तेथून निघून गेला आणि त्याने पहाटे 4:58 वाजता चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांना आरोपीच्या खिशात कुलुपाच्या चाव्या सापडल्या. त्यातील एक चावी ही त्या मुलीच्या रुमची होती. आरोपीने मुलीच्या रुमला कुलूप लावलं आणि चावी आपल्यासोबत घेतली.  


पोलिसांनी आतापर्यंत हॉस्टेलमधील सात ते आठजणांचे जबाब नोंदवले आहेत. पुढील तपास अजून सुरू आहे. वसतिगृहातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नाहीत आणि शासकीय निविदा प्रक्रियेच्या आधारे तीन सुरक्षा रक्षक असायला पाहिजे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपीचा आत्महत्येचा स्पष्ट हेतू होता. 


पीडित आणि आरोपी दोघांचेही मृतदेह त्यांचा अद्याप कुटुंबीयांनी ताब्यात घेतले नाहीत. 


या संबंधित बातम्या वाचा: