Ganshotsav 2023: गणेशोत्सवात करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा (Lalbaugcha Raja) गणेश मुहूर्त पूजन सोहळा आज पार पडला. संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन पार पडला. राज्यात पावसाळ्याला सुरुवात झाली नसली तरी पावसाळ्यातील सणाची तयारी मात्र आता सुरू झाली आहे.


लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचं हे 90 वं वर्ष आहे. बुधवारी (7 जून) सकाळी 6 वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे आणि कांबळी आर्ट्सचे मूर्तिकार रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तिकार कांबळी आर्ट्सच्या चित्रशाळेतच हा पूजा करण्यात आली. यावेळी खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकाचं देखील पूजन केलं आहे.


लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पहाटेच साधेपणाने लालबागच्या राजाच्या मूर्तीचं गणेश मुहूर्त पूजन करण्यात आले. या पूजनानंतर गणेशोत्सवाच्या तयारीला वेग येतो. आता सर्वांनाच बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागून राहिली आहे.


मुंबईतील लालबागचा राजा हा नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मुहूर्त पूजन पार पडले आहे. गणेशोत्सव काळात देश-परदेशातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि नवस करण्यासाठी मुंबईत येतात. लालबागच्या राजाकडे मागितलेल्या मनोकामना पूर्ण होतात, यावर भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळे दर गणेशोत्सवात लालबागला राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.


'यंदा घरगुती पीओपीच्या मूर्तींवर बंदी नको'


घरगुती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (POP) गणेश मूर्तींवर बंदी घालू नका, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. गणेशोत्सव हा मुंबईतील महत्त्वाचा मोठा पारंपरिक उत्सव आहे. यासाठी लागणाऱ्या पीओपी मूर्ती बनवण्याच्या व्यवसायावर अनेक कुटुंबे अवलंबून असतात. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने नेमण्यात आलेल्या तांत्रिक समितीचा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत पीओपीच्या मूर्तीवर सरसकट बंदी घालणं अयोग्य ठरेल, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली. 


पीओपीच्या चार फुटाखालील गणेश मूर्त्यांवर बंदी घालण्यासंदर्भात मुंबई महापालिकेने घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नाही, म्हणत या निर्णयाला आशिष शेलार यांनी विरोध दर्शवला आहे. मुंबई पालिकेने समुद्र स्वच्छ होण्यासाठी, प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी योग्य यंत्रणा का निर्माण केली नाही? असा सवाल यावेळी शेलार यांनी उपस्थित केला.


हेही वाचा:


Pandharpur: आषाढीला येणाऱ्या 20 लाख वारकऱ्यांची होणार आरोग्य तपासणी! आषाढीमध्ये राज्य सरकारचा अभिनव उपक्रम