Mumbai: मरीन ड्राईव्हजवळील सरकारी महिला हॉस्टलमध्ये तरुणीवर अतिप्रसंग करुन तिची हत्या करण्यात आली, तिचे शव जेजे रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. हॉस्टेलच्या वॉचमनने तिच्यावर अतिप्रसंग करुन तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मुलीची हत्या (Hostel Girl Murder) केल्यानंतर वॉचमनने स्वतः रेल्वेखाली उडी मारून जीव दिला असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. मयत तरुणीचे कुटुंब अकोल्यावरून मुंबईत दाखल झाले आहे.
या घटनेनंतर, जोपर्यंत हॉस्टेलमधील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मयत मुलीच्या वडिलांनी घेतली आहे. जातीयवाद म्हणून माझ्या मुलीला चौथ्या मजल्यावर एकटे ठेवले का? असा सवाल मुलीच्या वडिलांनी केला आहे. वॉचमन ओमप्रकाश मुलीला त्रास देत होता, उद्या आमची मुलगी गावाला येणार होती, परंतु त्याआधीच ही घटना घडली आणि याला जबाबदार हॉस्टलचे अधिकारी आहेत. त्यामुळे, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी मयत मुलीच्या वडिलांनी केली आहे.
ओमप्रकाश कनोजिया (वय 33 वर्ष) हा आरोपी सुरक्षा रक्षक दिवसा वसतिगृहातील पाणी भरणे वैगरे कामं करायचा आणि रात्री तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता आणि तो वसतिगृहाच्या मागेच राहायला होता, अशी माहिती वसतिगृहातील दुसऱ्या सुरक्षा रक्षकाने दिली.
वसतीगृह अधिक्षकांचं सरकारकडे बोट
तर, वसतिगृहाच्या अधीक्षक वर्षा अंधारे यांनी देखील या घटनेवर भाष्य केलं आहे. वसतिगृहात आम्हाला रात्रीच्या वेळेस 2 सुरक्षारक्षकांची गरज लागते, परंतु गेल्या वर्षी सरकारकडून सुरक्षारक्षकांच्या संख्येत कपात करण्यात आली आणि त्यामुळे आम्ही सदर व्यक्तीला सपोर्ट स्टाफ म्हणून ठेवले असल्याचं त्या म्हणाल्या. वसतिगृहाच्या प्रत्येक खोलीत 2 मुली राहतात. सदर मुलीच्या खोलीमध्ये सुद्धा एक मुलगी राहत होती. परंतु ती आता शेवटच्या वर्षाला असल्यामुळे तिची परीक्षा संपल्यानंतर ती वसतीगृह याच वर्षी सोडून गेली असल्याची प्रतिक्रिया वसतीगृह अधिक्षकांनी दिली.
सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर - अजित पवार
मुलींच्या वसतिगृहाबाबत सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आला आहे आणि याबाबत अधिक बळकट व्यवस्था व्हावी, यासाठी सरकारने अधिक पावलं उचलली पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधा पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. मुलीवर अतिप्रसंग करणारा आरोपी हा सरकारतर्फे नियुक्त केलेला नव्हता, अशी माहिती अजित पवारांनी दिली. त्याचप्रमाणे आरोपी फोनवरून अनेक मुलींच्या तो संपर्कात होता, त्याला काही गोष्टी, साहित्य आणायला सांगितलं जायचं, असं अजित पवार म्हणाले.तर, सदरची घटना ही अत्यंत दुर्दैवी असून अधिवेशनात हा मुद्दा उचलणार असल्याचं अजित पवार म्हणाले.
हॉस्टेलमध्ये सीसीटीव्ही, रुममध्ये अलार्म बेल बसवण्याची गरज - सुप्रिया सुळे
मुंबईत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार अजिबात गंभीर नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. अशा घटना टाळण्यासाठी शासकीय हॉस्टेलमध्ये आणखी सीसीटीव्ही बसवले पाहिजे, हॉस्टेलमधील मुलींच्या रूममध्ये अलार्म बेल लावायला हव्या, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे.
आरोपीची नजर बरोबर नव्हती - चित्रा वाघ
संबंधित घटना अतिशय संतापजनक असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे. आरोपी सुरक्षा रक्षक हा पेशाने धोबी होता. आधी तो इथे धोब्याचं काम करत होता आणि त्याच्यावर सगळयांचा विश्वास असल्याने त्याला वॉचमनचं काम दिलं होतं, असं हॉस्टेलमधील मुलींशी संवाद साधल्यानंतर चित्रा वाघ म्हणाल्या. मुलींच्या म्हणण्यानुसार त्या आरोपीचं वागणं बरोबर नव्हतं आणि त्याची नजर चांगली नव्हती. जो धोब्याचं काम करायचा त्याला वॉचमनचं काम कसं देण्यात आलं? कोणी परवानगी दिली? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. हॉस्टेलमधील फक्त ग्राऊंड फ्लोरचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आणि प्रकरणाची कसून चौकशी करण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या.
सरकारच्या दुर्लक्षामुळे घटना घडली - विद्या चव्हाण
हॉस्टेलमध्ये खाजगी सुरक्षा रक्षक काम करत होता, मात्र सरकारी सुरक्षा रक्षक पाहिजे होता आणि वारंवार सुरक्षारक्षकासाठी मागणी केली जात होती, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या. सरकारने सुरक्षा रक्षकाच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे असा प्रसंग घडल्याचं त्या म्हणाल्या.
हेही वाचा: