Congress On BMC Corruption : पाच वर्षात BMC चा रस्त्यांवर 12 हजार कोटींचा खर्च; काँग्रेसची सीबीआय चौकशीची मागणी
Congress On BMC Corruption : मुंबई महापालिकेने रस्त्यांसाठी पाच वर्षात 12 हजार कोटींचा खर्च केला असून याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
Congress On BMC Corruption : मागील पाच वर्षात मुंबईच्या रस्त्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने तब्बल 12 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. मुंबईकरांचा पैसा लुटणाऱ्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केली आहे. मुंबईतील रस्त्यांच्या मुद्यावरून भाजपनंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेसनेही शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
मिलिंद देवरा यांनी ट्वीट करत म्हटले की, मुंबई महापालिकेने 2017 ते 2022 या पाच वर्षात रस्त्यांसाठी तब्बल 12 हजार कोटींचा खर्च केला आहे. ही रक्कम म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बजेटच्या 10 टक्के इतकी आहे. मात्र, तरीदेखील मुंबईकरांना दरवर्षी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येला सामोरे जावे लागते. देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिकेची कोण लूट करतेय, हे जाणून घेण्याचा मुंबईकरांना अधिकार असल्याचे मिलिंद देवरा यांनी म्हटले. हे भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक असून याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी देवरा यांनी केली. या प्रकरणाचा तपास आणि मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार उघड करण्याचा अधिकार राज्य सरकारलादेखील आहे. पण, महाराष्ट्र सरकारकडे सीबीआयकडे तपास देण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे का, असा सवालही त्यांनी केला.
कोणत्या वर्षी किती खर्च?
मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्वीटमध्ये दरवर्षी मुंबईतील रस्त्यांवर खर्च झालेल्या निधीची आकडेवारी जाहीर केली आहे. मिलिंद देवरा यांच्या ट्वीटनुसार, वर्ष 2017-18 मध्ये 2300 कोटी, 2018-19 मध्ये 2250 कोटी, 2019-20 मध्ये 2560 कोटी, वर्ष 2020-21 मध्ये 2200 कोटी आणि वर्ष 2021-22 मध्ये 2350 कोटींचा खर्च करण्यात आला. त्याशिवाय, रस्त्यांची देखभालीवर होणारा खर्च वेगळा आहे. खड्डे बुजवण्यासाठीच्या कोल्ड मिक्ससाठी दरवर्षी 45 कोटीं खर्च करण्यात येतात. मागील पाच वर्षात 225 कोटी खर्च करण्यात आले असल्याचा आरोप देवरा यांनी केला.
Between 2017-22, @mybmc spent ₹12,000 crore on Mumbai’s roads — a staggering 10% of @NHAI_Official’s annual budget!
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) August 24, 2022
Mumbaikars brave potholes every year & deserve to know who is looting India’s richest civic body.
I demand a CBI probe. Roads are just the tip of the iceberg. pic.twitter.com/AmVO4CRkON
मिलिंद देवरा सक्रिय
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार मिलिंद देवरा हे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी डावलण्यात आल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून ते सक्रिय झाले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबई महापालिकेच्या वॉर्डची पुनर्रचना करण्यात आली होती. या पुनर्रचनेवर काँग्रेस नाराज होती. वॉर्ड पुनर्रचनेत काँग्रेसच्या अनेक विद्यमान नगरसेवकांना फटका बसला होता. त्याविरोधात इतर काँग्रेस नेत्यांसह मिलिंद देवरा यांनीदेखील आक्षेप नोंदवला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत वॉर्ड पुनर्रचना रद्द करण्याची मागणी केली होती.