Best Strike: सलग दुसऱ्या दिवशी 'बेस्ट' विस्कळीत;पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप सुरूच
BEST Bus Workers Strike: सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत बेस्ट बसची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुलुंड, मुंबई सेंट्रल,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आगारात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.
मुंबई : बेस्टच्या घाटकोपर डेपोमधील कंत्राटी चालक काल सकाळपासून संपावर गेले आहेत. पगार वाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी हा संप (BEST Bus Workers Strike) पुकारला आहे. हा संप आता अनेक आगारांमध्ये पसरला आहे. देवनार, आणि, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे ,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आणि मजास या आगारांमधील कंत्राटी चालकही आज संपावर गेले आहे. याचा फटका मात्र सामान्य मुंबईकरांना बसतोय.
पगारवाढ आणि बेस्टच्या सुविधा अशा विविध सुविधांची मागणी हे कंत्राटी कर्मचारी मागणी करत होते.या मागण्यांसाठी प्रज्ञा खजुरकर या सहकुटुंब आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत.त्यांना समर्थन देण्यासाठी आणि आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी या कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत . आपल्या मागण्यांवर हे सर्व कर्मचारी ठाम आहेत, तसेच जोपर्यंत आपल्या मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप सुरुच राहिल असा आक्रमक पवित्राही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
नऊ हजार कंत्राटी कर्मचारी संपावर
सध्या बेस्टमध्ये अंदाजे नऊ हजार कंत्राटी कर्मचारी आहे. हे नऊ हजार कर्मचारी संपावर असल्याचा दावा कंत्राची कर्मचारी संस्थेने केला आहे. यामध्ये एसएमटी एटीपीएल असोसिएटचे दोन हजार कंत्राटी कर्मचारी, मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्टचे तीन हजार कंत्राटी कर्मचारी, हंसा ग्रुपचे दीड हजार, टीएमएल ग्रुपचे दोन हजार ,ओलेक्ट्रा ग्रुपचे 500 इतके खाजगी कंत्राटी कर्मचारी आहेत. कंत्राटी कामगारांच्या संपाचा फटका घाटकोपर, देवनार, आणिक, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे ,प्रतीक्षा नगर, धारावी आगार, सांताक्रुज आगार, मजास आगार या आगरांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
या अगोदर देखील कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन केले आहे. प्रशासनाने आपला आर्थिक भार कमी करण्यासाठी बस आणि चालकांची कंत्राटदारांकडून नियुक्ती केली आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये मागील काही महिन्यांपासून असंतोष निर्माण झाला आहे. यामध्ये वेळेवर पगार न होणे, नियुक्तीपत्र न देणे आदींसारखे मुद्दे आहेत. सलग दोन दिवस काम बंद आंदोलन सुरू असल्याने मुंबईकर प्रवाशांची गैरसोय होत आहे.
बेस्टमध्ये कंत्राटी बसेस का?
आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्ट प्रशासनाने खर्च कमी करण्यासाठी आपल्या ताफ्यात कंत्राटी पद्धतीने बस ताफ्यात घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी निविदा काढण्यात आल्यात. बस आणि चालक यांची नियुक्ती कंत्राटदाराकडून करण्यात येते. तर, निविदेत निश्चित केलेली रक्कम कंत्राटदाराला बेस्टला द्यावी लागते. यामुळे नवीन बस खरेदी आणि नवीन चालकांची नियुक्ती बेस्टला करावी लागत नाही. त्याच्या परिणामी बेस्टची काही प्रमाणात बचत झाली. कंत्राटदाराकडून बेस्टच्या मिनी एसी बस, एसी बस, इलेक्ट्रीक बस चालवण्यात येते. मुंबईत विविध आगारात वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून सेवा पुरवण्यात येते.