Prasad Lad Mumbai Bank : मुंबई बँक संचालक मंडळातील सदस्यांच्या पात्रतेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सहकारी संस्थेच्या नियमांचं उल्लंघन करत बँकेचे संचालक झाल्याचा आरोप 'आप'ने केला आहे. तर, मी माझ्या कंपनीचा नोकरदार असल्याचे सांगत लाड यांनी स्वत:चा बचाव केला आहे. नोटीस आल्यास कायदेशीर उत्तर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


आम  आदमी पक्षातचे धनंजय शिंदे यांनी मुंबई बँकेच्या संचालक मंडळावर आरोप केले आहेत. बँकेतील संचालक मंडळ ही प्रवीण दरेकर यांची टोळी असून यामध्ये सर्वपक्षीय सदस्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचारी म्हणून प्रसाद लाड निवडून येत आहेत. मात्र ते कर्मचारी नाहीत. सहकारी संस्थेच्या नियमांचं उल्लंघन आहे. 


नाबार्डकडून बँकेच्या अनियमितेवर बोट ठेवण्यात आले असल्याचे शिंदे यांनी म्हटले. लाड यांच्या कंपनीला कमी टक्क्यात व्याज देण्यात आलं जेव्हा ते संचालक मंडळावर होते. हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे प्रकरण दाबलं असल्याचाही आरोप शिंदे यांनी केला. 


महाविकास आघाडीकडून असहकार


या प्रकरणात महाविकास आघाडीतील सहकारमंत्री आम्हाला असहकार करत असल्याता आरोप शिंदे यांनी केला. महाविकास आघाडीतील नेते प्रवीण दरेकरांना मदत करत आहेत. दरेकरांवर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही  सतत करतोय मात्र प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे हात दगडाखाली असल्याचे त्यांनी म्हटले. 


जोरदार प्रत्युत्तर मिळणार; लाड यांचे आव्हान


भाजप आमदार प्रसाद लाड यांनी 'आप'चे आरोप फेटाळून लावले आहेत. मी माझ्या कंपनीचा नोकरदार आहे. मुकेश अंबानी उद्योगपती असले तरीही ते त्यांच्या कंपनीत ते नोकर आहेत अशी भूमिका प्रसाद लाड यांनी व्यक्त केली. 'आप'चे शिंदे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप लाड यांनी केला. 


या प्रकरणात मला नोटीस येईल अशी अपेक्षा आहे. मला नोटीस येऊ द्या, त्याचं मी कायदेशीर उत्तर देणार असल्याचेही लाड यांनी सांगितले. माझ्या विरोधात असणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे आव्हान लाड यांनी दिले.