Prasad Lad : मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप असताना आता भाजप नेते प्रसाद लाडही अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रसाद लाड हे पगारदार पतसंस्था प्रवर्गातून मुंबई बँकेचे संचालक आहेत. मात्र, त्यांनी  स्वतःच कंपनीचे संचालक असताना ते कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीत कामगार असल्याचे नमूद केल्याचा आरोप सहकार सुधार समितीने केला आहे. 


मुंबईत बुधवारी बँक कामगारांचे नेते विश्वास उटगी आणि आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला. मुंबई बँकेचे संचालक आमदार प्रसाद लाड यांनी स्वतःच्या कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीत पगारदार नोकर असल्याचे दाखवून ते पगारदार नोकरांच्या पतसंस्था गटातून ते मुंबई बँकेतून निवडून येत असल्याचे सहकार सुधार समितीने म्हटले. मुंबई बँकेचे संचालकपद मिळवण्यासाठी प्रवीण दरेकर यांनी मजूर असल्याचे खोटे दस्तावेज दिले. तसेच त्यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी प्रतिज्ञा पत्रावर खोटे बोलले आहेत. त्यांनी हा गुन्हा केलेला असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी  विश्वास उटगी आणि धनंजय शिंदे यांनी केली.


दरेकरांप्रमाणेच मुंबई बँकेत आणखी तीन संचालकांनी बोगस पुरावे देऊन मजूर संस्थेचे सदस्य झाले आहेत. त्या प्रवर्गातून त्यांनी मतदान केले आहे. तर आनंदराव गोळे, विनोद बोरसे आणि विठ्ठल भोसले अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी आनंदराव गोळे हे मजूर संस्था प्रवर्गातून संचालक झाले आहेत.  त्यांचे स्वतंत्र व्यवसाय आहेत, मालमत्ता कोट्यवधींच्या आहेत. तरीही ते 'मजूर' असल्याचा आरोप विश्वास उटगी यांनी केला. या सर्वांविरुद्ध मुंबई बँकेच्या निवडणुकीच्या वेळी सहकार सुधार समितीच्या लोकांनी सहकार निबंधकांकडे तक्रारी केल्या होत्या. चौकशीची मागणी केली होती. पण सहकार विभाग हा भ्रष्टाचाराने बरबटला असून तक्रारीची दखलही न घेता त्यावेळी या सर्वाना पात्र उमेदवार म्ह्णून घोषित केले असल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्वांची चौकशी झाल्यास वस्तुस्थिती समोर येईल, असेही  विश्वास उटगी आणि धनंजय शिंदे यांनी यावेळी सांगितले.


प्रवीण दरेकर बँकेचे अध्यक्ष असताना मध्य प्रदेशात केलेल्या गुंतवणुकीमुळे मुंबई बँकेला सुमारे 300 कोटींचा फटका बसला आहे. तर संगणक खरेदी, माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी दिलेली कंत्राटे, बोगस कर्ज वाटप, कार्पोरेट कर्जे वाटताना झालेली अनियमितता, दरेकरांच्या नातेवाईकांनी बँकेच्या अशोकवन व अन्य शाखेत केलेल्या बोगस कर्ज घोटाळा, मुंबई बँकेत झालेला नोकरभरती घोटाळा, सन 2014 ते 2021 या काळात सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे अहवाल, अशा घोटाळ्यांच्या मालिकाच दरेकरांच्या नावाशी जोडलेल्या आहेत. त्यांची सखोल चौकशी झाल्यास अनेक सत्य उघडकीस येतील, असेही उटगी यांनी सांगितले.