Mumbai Bank Election :  मुंबई बँक निवडणुकीत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या पॅनेलचे एकहाती वर्चस्व राहिले. प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेल सर्व 21 जागांवर विजयी झाले आहेत. यातील 17 जागा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. तर, उर्वरीत चार जागांची मतमोजणी आज पार पडली.


आज झालेल्या मतमोजणीत दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे चारही उमेदवार विजयी झाले.  मध्यवर्ती ग्राहक (होलसेल कंझ्यूमर्स) मतदार संघातून  विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांचा पराभव केला. विठ्ठल भोसले यांना 18 मतं तर सुखदेव चौगुले यांना 16 मतं मिळाली.  प्राथमिक ग्राहक मतदार संघात पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पुरुषोत्तम दळवी यांना 131 मतं तर कमलाकर नाईक यांना 59 मतं मिळाली. तर, महिला सहकारी संस्था मतदार संघ जयश्री पांचाळ यांना 332 मतं तर, शालिनी गायकवाड यांना 188 मतं मिळालीत. 


भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघातून अनिल गजरे यांना तब्बल  4 हजार  मते मिळाली तर,  यलाप्पा कुशाळकर यांना अवघी 350 मते मिळाली. प्रवीण दरेकर यांच्या पॅनलमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या उमेदवारांचा समावेश होता. तर, शिवसेना बंडखोरांनी चार ठिकाणी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली.


मुंबई बँकेत अभिजीत घोसाळकर, सुनिल राऊत, अभिजीत अडसूळ, शिल्पा सरपोतदार हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. तर, निवडणुकीतून शिवसेना बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर, संजना घाडी आणि स्नेहा कदम यांनी माघार घेतली. तर कमलाकर नाईक यांनी बंडखोरी कायम ठेवली. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 


लोकांचा विश्वास असल्याने विजय; दरेकर 


मुंबईतील सहकारी चळवळीतील लोकांनी मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवला असल्याने हा विजय मिळाला असल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली. नाबार्ड, आरबीआयच्या निकषात काम केल्याने बँकेचा विकास होत आहे. त्यामुळेच आमच्या पॅनलला यश मिळाले असल्याचे दरेकर यांनी म्हटले. 


 


बिनविरोध विजयी झालेले १७ उमेदवारांची नावे


नागरी सहकारी बँक
संदीप सीताराम घनदाट
आ.प्रविण यशवंत दरेकर


पगारदार सहकारी संस्था
आ.प्रसाद मिनेश लाड


नागरी सहकारी पतसंस्था
शिवाजीराव विष्णू नलावडे
  
गृहनिर्माण संस्था
आ.सुनील राजाराम राऊत
अभिषेक विनोद घोसाळकर


मजुर सहकारी संस्था
आ.प्रविण यशवंत दरेकर
आनंदराव बाळकृष्ण गोळे


औद्योगिक सहकारी संस्था
सिद्धार्थ तात्यासाहेब कांबळे
विष्णू गजाभाऊ घुमरे


इतर सहकारी संस्था
नंदकुमार मानसिंग काटकर
जिजाबा सीताराम पवार


व्यक्तिगत (वैयक्तिक)
सोनदेव बाळाजी पाटील


महिला राखीव मतदार संघ
शिल्पा अतुल सरपोतदार
कविता प्रकाश देशमुख


अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ
विनोद दामू बोरसे


इतर मागासवर्गीय मतदार संघ
नितीन धोंडीराम बनकर