Mumbai Air Pollution : धूळ आणि प्रदूषणाने मुंबईकर त्रस्त; अखेर महापालिकेकडून उपाययोजना सुरू
Mumbai Air Quality : मुंबईत वाढलेले हवा प्रदूषण आणि धूळ नियंत्रणात ठेवण्यासाठी अखेर मुंबई महापालिकेकडून उपाययोजना आखण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईतील हवा प्रदूषणात (Mumbai Air Pollution) मोठी वाढ झाली आहे. या हवा प्रदूषणावर मुंबई महापालिका (BMC) आणि राज्य सरकारवर टीका झाली होती. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील विविध भागांत आज मिस्ट मशीन्सचा (Mist Machines) वापर करून हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी सूक्ष्म जल फवारणी करण्यात आली.
वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर (Air Quality In Mumbai) विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत बांधकाम आणि प्रदूषणाशी संबंधित सर्व संस्था, संघटनांची संयुक्त बैठक महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी नुकतीच घेतली होती. मुंबईत सुरू असलेल्या सर्व बांधकामांच्या ठिकाणी धूळ आणि प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले होते.
वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रित करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने तत्काळ उपाययोजना सुरू करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी… pic.twitter.com/J4CzqlYo8F
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 22, 2023
त्यानुसार, मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने मुंबईतील धूळ आणि प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी वाहनावर बसविलेल्या मिस्ट मशीन्सचा वापर करून वरळी सी फेस, हाजी अली, पेडर रोड, स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी), नरिमन पॉईंट, फॅशन स्ट्रीट, बधवार पार्क, वर्ल्ड ट्रेड सेंटर आदी परिसरात हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी फवारणी करण्यात आली. मुंबई शहर, उपनगर आदी भागांमध्येही तुषार फवारणीसोबत अन्य उपाययोजनांही प्रशासनाकडून हाती घेण्यात येत आहेत.
सफर या संस्थेच्या नोंदींनुसार शहरातील हवेचा दर्जा काही दिवसांपासून वाईट श्रेणीत नोंदला जात आहे. वातावरणातील घातक धूलीकणांचे प्रमाण वाढले आहे. माझगाव, कुलाबा, अंधेरी, मालाड, परळ, मुलुंड या परिसरातील हवा अतिवाईट श्रेणीत असल्याची नोंद झाली. मुंबई शहरात धुलीकणांच्या प्रमाणाने अतिधोकादायक पातळी ओलांडली आहे. सतत वाढत असलेल्या प्रदुषणामुळे मुंबईतील हवेचा दर्जा खालावला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :