Mukesh Ambani Gift: मुकेश अंबानी झाले 'मोदीं'वर खुश; दिले थेट 1500 कोटी रुपयांचं घर गिफ्ट
Mukesh Ambani Gift: भारतातील अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांच्या एका कर्मचाऱ्याला चक्क 1500 कोटींचे घर भेट दिले आहे. कर्मचाऱ्याच्या कामावर प्रभावित होऊन त्यांनी हा निर्णय घेतला.
Mukesh Ambani Gift: देशातील नव्हे, तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी त्यांच्या रिलायन्स कंपनीतल्या एका कर्मचाऱ्याला 1500 कोटींचे घर भेट दिले आहे. कर्मचाऱ्याची कामाप्रती निष्ठा पाहून मुकेश अंबानी प्रभावित झाले आणि त्यांनी तब्बल 1500 कोटी रुपयांचं 22 मजली आलिशान घर कर्मचाऱ्याला भेट दिले. मुकेश अंबानी यांनी ज्या कर्मचाऱ्याला 1500 कोटींचे घर दिले, ते मुकेश अंबानींचा उजवा हात मानले जातात. मनोज मोदी असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
कोण आहे तो कर्मचारी ज्याच्या कामावर अंबानी झाले प्रभावित?
मनोज मोदी हे मुकेश अंबानींचे विश्वासू कर्मचारी आहेत, त्यांच्याशिवाय मुकेश अंबानींचे पानही हलत नाही. मुकेश अंबानींच्या जळच्या व्यक्तींमध्ये मनोज मोदींचे नाव आवर्जून घेतले जाते, तर मनोज मोदी हे शालेय जीवनापासून मुकेश अंबानींचे वर्गमित्र असल्याचेही म्हटले जाते. दोघांनी मुंबई विद्यापीठाच्या केमिकल्स टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये एकत्र अभ्यासक्रम पूर्ण केला होता. मनोज मोदींनी 1980 च्या दशकाच्या सुरूवातीला रिलायन्समध्ये प्रवेश केला होता. मुकेश अंबानी यांचे वडील आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापर धिरुभाई अंबानी यांच्या नेतृत्वाखाली मनोज मोदींनी रिलायन्समध्ये नोकरीला सुरुवात केली.
अंबानींनी भेट दिलेले आलिशान घर कुठे आहे स्थित?
मुकेश अंबानींनी मनोज मोदींना भेट दिलेले घर हे मुंबईतील नेपियन सी या अत्यंत उच्चभ्रू वस्तीत आहे, या भागातील घरे अत्यंत महागडी आहेत. भेट दिलेले निवासस्थान 1.7 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर पसरले आहे. या निवासस्थानाची किंमत तब्बल 1500 कोटी असल्याचे सांगितले जाते. Leighton India Contractors Pvt Ltd द्वारे ही इमारत बांधली जात आहे. मुकेश अंबानींनी मनोज यांना भेट दिलेल्या इमारतीचे नाव क्रिस्टेनेड वृंदावन आहे.
कशी आहे इमारतीची रचना?
मनोज मोदी हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसह या निवासस्थानी राहणार आहेत. ही 22 मजली इमारत असून 22 मजल्यांपैकी सात मजले हे वाहनांच्या पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. इमारतीच्या प्रत्येक मजल्याची रचना कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेनुसार करण्यात आली आहे.
इमारतीच्या आठव्या ते दहाव्या मजल्यावर मनोरंजनाच्या सुविधा असतील. अत्याधुनिक खेळांच्या सोयी या ठिकाणी असतील. डिजिटल गेमिंग, पार्टी रुम, फॉर्मल मीटिंग एरिया, स्पा, 50 प्रेक्षक बसण्याची क्षमता असलेले थिएटर याच भागात असेल.
इमारतीच्या 11 ते 13 मजल्यांवर मनोज मोदींची लहान मुलगी भक्ती मोदी राहील. भक्ती रिलायन्स रिटेलमध्ये इशा अंबानींसोबत काम करते.
मनोज मोदींचे कार्यालय देखील इमारतीतच असेल, 14 व्या मजल्यावर कार्यालय असेल आणि 15 व्या मजला हा पूर्णत: वैद्यकीय सुविधांसाठी राखीव असेल, जिथे एक इन हाऊस मेडिकल आयसीयू देखील असेल.इमारतीच्या 16 ते 18 मजल्यांवर त्यांची मोठी मुलगी खुशबू पोद्दार, तिचे पती राजीव पोद्दार, सासरे अरविंद आणि सासू विजयालक्ष्मी पोद्दार वास्तव्य करतील. पोद्दार परिवार हे बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी)चे मालक आहेत.
इमारतीच्या 19 आणि 21 व्या मजल्यावर पेंटहाऊस असेल, तिथे मोदी त्यांच्या कुटुंबासोबत राहतील. इमारतीतील फर्निचर नीता अंबानींनी पसंद केलेल्या डिझाइनचे असेल. मोदी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी 175 कर्मचारी निवासस्थानी हजर असतील. त्यात ख्यातनाम शेफ आणि व्यवस्थापकांचा समावेश असेल. इमारतीच्या सुरक्षेसाठी खास काळजी घेण्यात आली आहे, इमारतीची सुरक्षा यंत्रणा इस्रायलस्थित कंपनीने डिझाईन केली आहे.