MPSC Exam | आज परीक्षेची तारीख जाहीर होईल, परीक्षा आठवड्याभरात होईल: मुख्यमंत्री
मुख्य सचिव आणि एमपीएससीच्या प्रमुखांना तारखांचा घोळ मिटवून आजच तारीख जाहीर करा, अशी सूचना केली आहे. परीक्षेच्या तीन दिवसांआधी ती पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष होता. राज्यभरातील एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.
मुंबई : काही दिवसांसाठी एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलत आहोत. आज परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (11 मार्च) केली. परीक्षेच्या तीन दिवसांआधी ती पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष होता. राज्यभरातील एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पवित्रा पाहता सरकारने ही परीक्षा येत्या आठवड्याभरात घेतली जाणार असल्याचं सांगितलं.
हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याशी फोनवरुन संवाद साधून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांचं आंदोलन संवेदनशीलरित्या हाताळावं अशी सूचनाही केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, "विद्यार्थ्यांच्या भावनांशी मी सहमत आहे. केवळ काही दिवसांसाठी 14 तारखेची परीक्षा पुढे ढकलत आहोत. मुख्य सचिव आणि एमपीएससीच्या प्रमुखांना तारखांचा घोळ मिटवून उद्याच तारीख जाहीर करा, अशी सूचना केली आहे. येत्या आठवड्याभरात ही परीक्षा होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याचं कारण कोविडच आहे. परीक्षेची व्यवस्था करावी लागते, यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार आहे. त्यांची चाचणी करणं गरजेचं आहे. ज्यांना लस दिली आहे, त्यांनाच इथे नेमलं जाईल. ही माझी सूचना आहे."
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलली
राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी, 14 मार्च रोजी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याववर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं आयोगाने म्हटलं. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली.
पुण्यात विद्यार्थ्यांचा ठिय्या, राज्यभरातही पडसाद
एमपीएससीच्या या परिपत्रकानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला. पुण्याती नवी पेठेत उत्स्फूर्तपण जमून विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरही आंदोलनात सहभागी झाले होते. हळूहळू राज्यातील इतर जिल्ह्यातही याचे पडसाद उमटू लागले. परीक्षा झालीच पाहिजे या मागणीवर विद्यार्थी ठाम होते.