(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आरे मेट्रो कारशेडसाठी दोन हजार 238 झाडांवर कुऱ्हाड पडणारच, सत्तेत असूनही शिवसेना अपयशी
आरे वसाहतीतील मेट्रो रेल्वे 3 प्रकल्पा अंतर्गत मेट्रो कारशेडच्या प्रस्तावित बांधकामात अडथळा ठरलेली 2 हजार 238 झाडं कापण्यास आणि 464 झाडं पुनर्रोपित करण्यास तसेच 989 झाडं आहेत तशीच ठेवण्यासाठीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाला सादर केला होता.
मुंबई: मुंबईतील बहुचर्चित आरे मेट्रो कारशेडच्या बांधकामात अडथळा ठरणारी झाडं कापण्याचा प्रस्ताव महापलिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी भाजप आणि तज्ज्ञ सदस्यांच्या मदतीने मंजूर केला. सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधानानंतरही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी प्रशासनाला साथ दिल्याने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
शिवसेनेचे यशवंत जाधव यांनी प्रस्ताव मंजुरीचा तीव्र निषेध केला असून आयुक्त हे झाडांचे खुनी असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे तज्ज्ञांना परत पाठवा, अशी मागणी करत या मुद्द्याविरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचं शिवसेनेच्या वतीने जाहीर केलं.
आरे वसाहतीतील मेट्रो रेल्वे 3 प्रकल्पाअंतर्गत मेट्रो कारशेडच्या प्रस्तावित बांधकामात अडथळा ठरलेली 2 हजार 238 झाडं कापण्यास आणि 464 झाडं पुनर्रोपित करण्यास तसेच 989 झाडं आहेत तशीच ठेवण्यासाठीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाला सादर केला होता. त्यानंतर सदस्यांनी केलेल्या मागणीनंतर पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. परंतु शिवसेनेचे 6 सदस्य वगळता सर्व सदस्यांनी झाडं कापण्याच्या बाजूने मतदान केलं.
काँग्रेसच्या दोन सदस्यांनी सभात्याग केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसने उघडपणे झाडांच्या कत्तलीसाठी त्यांना पाठिंबा दिला. मेट्रोला विरोध नाही, पण कारशेडचे बांधकाम भूमिगत व्हावे किंवा कांजूरमार्गला व्हावे हीच आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. तज्ज्ञांनी झाडं कापण्याच्या बाजूने मतदान केल्याने त्यांना शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुख्यालयातून पळवून लावलं.शेवटी आंदोलनं, उपोषण करुनही दोन हजारांहून अधिक झाडांची कत्तल होणं अटळ आहे. सत्तेत असूनही शिवसेनेचा हा झाडं वाचवण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आहे.