बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिकांच्या मानधनात कपात करु नये, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
आरोग्य विभागाच्य नव्या आदेशानुसार, बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन 55 हजार ते 60 हजार दरम्यान आहे. मात्र याआधी हे मानधन सेवार्थ प्रणालीअंतर्गत मासिक वेतन आणि भत्ते मिळून 78 हजार एवढे होते.
मुंबई : कोरोनाविरुद्धच्या संकटात डॉक्टर्स, वैद्यकीय यंत्रणा रात्रंदिवस सेवा बजावत आहेत. या सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहे. मात्र महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच आरोग्य सेवा आयुक्तालय यांनी 20 एप्रिल 2020 रोजी काढलेल्या आदेशानुसार बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात 20 हजारांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या परिश्रमाच मोल त्यांना अधिक भत्ता देऊन करायला हवं, मानधन कमी करून नाही. मानधनातील ही कपात अन्यायकारक आणि डॉक्टरांचं मनोबल खच्चीकरण करणारी असल्याचं मनसे नेते अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. या डॉक्टरांने मानधन कपात करु नये या संदर्भात अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं आहे.
कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स निष्ठापूर्वक आपलं कर्तव्य बजावत आहेत. मात्र अशा स्थितीत त्यांच्या मानधनात कपात होणे पटणारं नाही. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग, आरोग्य सेवा आयुक्तालयाने काढलेल्या आदेशानुसार, बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन 55 हजार ते 60 हजार दरम्यान आहे. मात्र याआधी हे मानधन सेवार्थ प्रणालीअंतर्गत मासिक वेतन आणि भत्ते मिळून 78 हजार एवढे होते. नव्या आदेशानुसार बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन कंत्राटी सेवा अंतर्गत निश्चित करण्यात आले आहेत.
नव्या आदेशानुसार डॉक्टरांच्या मानधनात तब्बल 20 हजारांची कपात करण्यात आली आहे. ही कपात अन्यायकारक असून यामुळे बंधपत्रित डॉक्टरांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतून एबीबीएसची पदवी मिळाल्यानंतर या डॉक्टरांना बंधपत्रानुसार एक वर्षाची सेवा शासनास देणे बंधनकारक असते. त्यानुसार त्यांची बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय रुग्णालयात नियुक्ती केली जाते. हेच डॉक्टर सध्याच्या कोरोनाच्या लढाईत महत्वाची कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे त्यांची सर्वतोपरी काळजी घेण्याची गरज आहे, असं अमित ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
बंधपत्रित अधिपरिचारिकांच्या मानधनातही कपात
बंधपत्रित अधिपरिचारिकांच्या मानधनातही कपात करण्यात आली आहे. ज्या बंधपत्रित अधिपरिचारिकांना 35 हजार मानधन मिळत होते, त्यांना नव्या आदेशानुसार 25 हजार मानधन मिळणार आहे. त्यामुळे या सर्वांचं मानधन पूर्ववत करावं, अन्यथा त्यांना योद्धे म्हणण्यात अर्थ राहणार नाही, अशी विनंती अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
संबंधित बातम्या- Lockdown 4.0 | राज्य शासनाची नियमावली जाहीर
- Coronavirus: जगात प्रति लाख लोकसंख्येच्या प्रमाणात 4.1 मृत्यू, तर देशात 0.2 मृत्यू