एक्स्प्लोर
मीरा भाईंदरमधील रस्ते आता गोरेपान होणार
'अल्ट्राथीन व्हाईट टॉपिंग' या अद्यावत प्रणालीचा वापर करुन रस्ते पांढरे करण्याचा निर्णय मीरा भाईंदर महापालिकेने घेतला आहे.
मीरा भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील रस्ते आता गोरेपान दिसणार आहेत. 'अल्ट्राथीन व्हाईट टॉपिंग' या अद्यावत प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय मीरा भाईंदर महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे डांबराचे काळे रस्ते आता पांढरे दिसणार आहेत.
रस्ते 'उजळ' करण्यासाठी 100 कोटी रुपयांचं कर्ज महापालिकेने 'एमएमआरडीए'कडून घेतलं आहे.
येत्या काळात डांबरामुळे काळेकुट्ट दिसणारे मीरा भाईंदर परिसरातील रस्ते जर आपल्याला गोरेपान दिसले, तर नवल वाटायला नको. रस्ते पांढरेशुभ्र करण्यासाठी अल्ट्राथीन व्हाईट टॉपिंग या पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.
अल्ट्रा थिन व्हाईट टॉपिंग पद्धतीचे रस्ते अगदी सिमेंट काँक्रिट सारखेच दिसणार आहेत, मात्र त्यांचा रंग सफेद असेल. या पद्धतीत रस्ता खोदून त्यावर चार ते दहा इंचांचा अल्ट्रा थिन व्हाईट सिमेंटचा थर देण्यात येणार आहे. अशाप्रकारे बांधलेले रस्ते टिकाऊ आणि मजबूत होतात.
या पद्धतीचा अवलंब सर्वप्रथम अमेरिकेत केला होता. तर बंगळुरुमध्येही अशा पद्धतीचे रस्ते आहेत. हे रस्ते बांधण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेने 'एमएमआरडीए'कडे 225 कोटी रुपयाचे कर्ज मागितलं होतं. मात्र सध्या त्यांना 100 कोटींचं कर्ज मंजूर झालं आहे. त्यामुळे सध्या शहरात नऊ किलोमीटर लांबीचेच रस्ते या तंत्रज्ञानाने बांधणार असल्याचं पालिकेने सांगितलं.
कोणते रोड होणार पांढरेशुभ्र?
1. मीरा रोड पूर्वेकडील सिल्व्हर पार्क ते सृष्टी
2. मीरा रोड पूर्वेकडील नरेंद्र पार्क ते उड्डाणपुलापर्यंतचा रस्ता
3. भाईंदर पूर्वेकडील दीपक हॉस्पिटल ते सेवन इलेवन हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता
4. भाईंदरमधील गोल्डन नेस्ट रोडवरील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ते सेवन इलेवन हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता
5. मीरा रोड पूर्वेकडील शांतीनगर सर्कल ते कुणाल शॉपिंग सेटरपर्यंतचा रस्ता
6. घोडबंदर परिसरातील रस्ता
7. मीरा रोड पूर्वेकडील साईबाबानगर ते शीतलनगरपर्यंतचा रस्ता
8. मीरा रोडच्या शांती शॉपिंग सेंटर ते भक्ती वेदांतपर्यंतचा रस्ता
9. भाईंदर पूर्वेकडील प्रफुल्ल पाटील चौक ते विमल डेरीपर्यंतचा रस्ता
या रस्त्यासाठी टेंडर नोटीस काढण्याचं काम सुरु आहे. येत्या डिसेंबरपासून कामाला सुरुवात होणार असून वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचं आश्वासन पालिकेने दिलं आहे.
दुसरीकडे या प्रकल्पात भ्रष्टाचार होऊ नये, अशी आशा विरोधकांनी व्यक्त केली आहे. याहूनही चांगल्या आणि स्वस्त पद्धती असून त्याचाही विचार करायला हवा होता, असं विरोधकांनी सुचवलं. कोट्यवधी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या या रस्त्यांवर खड्डे पडणार का, हे तेव्हाच समजेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement