Bullock Cart Race : शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस, पाहा बैलगाडा शर्यतीच्या निर्णयावर काय म्हणाले राजकीय नेते
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुंबई - बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याचा महत्त्वपू्र्ण निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आल्याने राज्यातील बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आले असून, आजचा दिवस आनंदाचा असल्याचे त्यांनी म्हटलंय. नेमकं कोण काय म्हणाले ते पाहुयात.
राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला - सुनील केदार
बैलगाडी शर्यत सुरू झाल्याचा मोठा आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिलीय. अखेर चार वर्षानंतर राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांना मोठा आसरा दिला आहे. राज्य सरकारकडून सर्व वकिलांनी जिकरीचे प्रयत्न केले, त्यांचेही मी कौतुक करत असल्याचे केदार म्हणाले. अशाच प्रकारे लोकांच्या जनकल्याणचे, शेतकऱ्यांच्या हिताचं काम करण्यास महाविकास आघाडीचे सरकार सदैव प्रयत्नशील आणि कर्तव्य बजावत राहील असा विश्वास केदार यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी - गृहमंत्री
राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षासून बैलगाडा शर्यती बंद होत्या. १० वर्षापासून आम्ही बैलगाडा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत होतो. आज अखेर या लढ्याला यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात चांगले वकील दिले होते. त्यांनी चांगला युक्तीवाद केला. त्यामुळे अखेर राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. सरकारने घातलेल्या नियमांचे बैलगाडा मिलकांनी पालन करावे, असे आवाहन देखील वळसे पाटील यांनी केले.
सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार - चंद्रकांत पाटील
बैलगाडा शर्यतीला मिळालेल्या परवानगीच्या निर्णयाचे महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेमध्ये जल्लोषात स्वागत होत आहे. या निर्णयाबद्दल सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानत असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. सुप्रीम कोर्टाने ग्रामीण भागातील जनतेची मानसिक स्थिती समजून घेतली. याबाबत महाराष्ट्राबरोबरच तमिळनाडू, कर्नाटकमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली होती. या सकारात्मक निर्णयाचे नेतृत्व करणारे आमदार महेश लांडगे
आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांचेही चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले.
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय - शिवाजीराव आढळराव पाटील
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय दिल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आभार मानले. तसेच राज्यातील शेतकऱ्यांचे त्यांनी अभिनंदनही केले. बैलगाडा शर्यती बंद असल्यामुळे गेल्या साडेसात वर्षापासून गावोगावच्या यात्रा, जत्रा बंद होत्या. मात्र, यामुळे आता तेथील अर्थकारण आणि रोजगाराला चालना मिळेल असे आढळराव पाटील म्हणाले. गेल्या ४ महिन्यापासून राज्यातील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात होते. मात्र, आता त्यांना न्याय मिळाला आहे. सर्व शेतकरी बांधवांनी न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन करावे अशी विनंती देखील आढळराव पाटील यांनी केले. या निर्णयाचे श्रेय हे राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री यांचे असल्याचे ते म्हणाले.
ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे अभिनंदन - देवेंद्र फडणवीस
आमचा अतिशय पारंपारिक खेळ असलेल्या बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतली, याबद्दल मी न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. 2014 साली न्यायालयाने ही बंदी टाकली. आमचे सरकार राज्यात आल्यावर मी स्वत: यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी व्यक्त केले आहे. 2017 मध्ये आम्ही एक कायदा तयार केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून शर्यत सुरू केली होती, मात्र त्यावर बंदी घालण्यात आली होती.
‘रनिंग अॅबिलिटी ऑफ बुल’ असा शास्त्रीय अहवाल दोन महिन्यात तयार केला. आजचा निर्णय हा त्या अहवालाला स्वीकृत केल्यानंतर आला आहे. मला या निर्णयाचा अतिशय आनंद असल्याचे फडणवीस म्हणाले. या निर्णयानंतर आमदार महेश लांडगे यांचेही फडणवीस यांच्यासह ज्यांनी ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांचे अभिनंदन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :