एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दुष्काळग्रस्त गावांचा कायापालट, अमिताभसह आमीर आणि सचिनची उपस्थिती
मुंबई: राज्यात सतत पडणाऱ्या दुष्काळावर कायमची उपाय योजना करण्यासाठी राज्य सरकार एक नवी योजना सुुरु करत असून, याची मुहूर्तमेढ आज मंत्रालयात रोवली जाणार आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन, आमीर खान, सचिन तेंडुलकर यांच्यासह उद्योग जगतातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दुष्काळाच्या झळांनी मेटाकुटीस आलेल्या राज्यातील सुमारे एक हजार खेड्यांचे कायापालट करण्यासाठी सरकार नवीन योजना सुरु करणार आहे. यासाठी उद्योजकांच्या सीएसआर फंडातून उपलब्ध होणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या निधीचा वापर होणार आहे. यामाध्यमातून या गावांमध्ये सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्याची मुहूर्तमेढ गुरुवारी सकाळी 11 वाजता मंत्रालयात महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता आमीर खान आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत रोवली जाणार आहे.
उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व अर्थात सीएसआर फंडातून मिळणाऱ्या निधीतून पहिल्या टप्प्यात राज्यातील एक हजार गावांचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी सरकारने एक योजना तयार केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात उद्योग क्षेत्रातील नामवंत तसेच तज्ज्ञांच्या समोर या योजनेचा आराखडा मांडणार आहेत.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी अमिताभ, आमीर, सचिनसह सिमेन्सचे व्यवस्थापकिय संचालक सुनिल माथूर, हिंदुस्थान युनिलिव्हरचे संजीव मेहता, एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख, आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंद्रा कोचर, एल अॅन्ड टीचे कार्यकारी अध्यक्ष ए.एम. नाईक, अदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, टाटा समुहाचे रतन टाटा, व्हिडीओकॉनचे राजकुमार धूत, जिंदाल ग्रुपचे सज्जान जिंदाल, रिलायन्सचे मुकेश अंबानी, एसबीआय संचालिका अरूंधती भट्टाचार्य, टाटा सन्सचे सायरस मिस्त्री यांच्याबरोबरच हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दुष्काळी एक हजार गावांची निवड करून तेथे या सीएसआर फंडातून सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. यामध्ये जलयुक्त शिवार, हागणदारी मुक्त गाव, शिक्षणात सुधारणा, नद्या, नाले, विहिरींचे पुनरूज्जीवन, 24 तास शुद्ध पाणी आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्यातून या गावांचा खऱ्या अर्थाने सर्वांगिण विकास व कायापालट घडवून आणण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement