महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज मुंबईत; अजित पवार भाषण करणार का? याकडे लक्ष
Mahavikas Aghadi Vajramuth Sabha: महाविकास आघाडीची आज मुंबईत वज्रमूठ सभा होणार आहे.
Mahavikas Aghadi Vajramuth Sabha: आज 1 मे... महाराष्ट्र दिन (Maharashtra Day 2023). आजच्याच दिवशी महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) मुंबईत (Mumbai News) वज्रमूठ सभा (Vajramuth Sabha) पार पडणार आहे. मुंबईत वांद्रे येथील बीकेसी (BKC) ग्राउंडवर महाविकास आघाडीची भव्य वज्रमूठ सभा पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू असून आतापर्यंत अनेक प्रमुख नेत्यांनी सभेच्या तयारीचा आढावाही घेतला आहे. तसेच, पोलिसांकडूनही सभास्थळी सुरक्षेची पाहणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाच्या सरकार विरोधात महाविकास आघाडीनं वज्रमूठ आवळली आहे. राज्यभरात महाविकास आघाडीकडून वज्रमूठ सभांचा धडाका सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर नंतर आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची मुंबईत सभा होणार आहे. मुंबईतल्या बीकेसी मैदानात महाविकास आघाडी शक्तीप्रदर्शन करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा याच बीकेसी मैदानात पार पडला होता. आता महाविकास आघाडी महाराष्ट्र दिनी शिंदे सरकारवर त्याच मैदानातून हल्लाबोल करणार आहे.
तिन्ही पक्षांकडून मुंबईतील वज्रमूठ सभेसाठी जोरदार तयारी केली जात आहे. सभेच्या ठिकाणी स्टेज उभारण्यात आला आहे. सोबतच तिन्ही पक्षाचे झेंडे देखील परिसरात लावण्यात आले आहेत. सोबतच अतिरिक्त पोलीस आयुक्त पी.एस. दहिया यांच्याकडून देखील सभेच्या ठिकाणी आढावा घेण्यात आला आहे.
महाविकास आघाडीच्या राज्यभरात 16 सभा
महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाचं सरकार विरोधात महाविकास आघाडीनं वज्रमूठ आवळली आहे. राज्यभरात महाविकास आघाडीच्या 16 सभा होणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. त्यानंतर दुसरी सभा नागपुरात पार पडली होती आणि आज मुंबईत सभा होणार आहे.
महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वज्रमुठ सभेत सांगितले. महाविकास आघाडीचा कणा असणारे कार्यकर्ते जीवाचे रान करतील, असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. आता पेटून उठावे लागेल, एकाच हातात घड्याळ पंजा आणि मशाल आहे. हा एकोपा टिकविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करणार आहोत, आपणही एकोपा टिकवा, असे आवाहन त्यांनी केले.
मुंबईतील वज्रमूठ सभा ऐतिहासिक होणार : संजय राऊत
आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. ही सभा ऐतिहासीक होणार असल्याचा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला. त्या सभेची तयारी, आमचा जोष पाहायला देशाचे गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) मुंबईत आले असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. आमची नागपूरला सभा होती त्यावेळी पण गृहमंत्री खारघरला आले होते असेही राऊत म्हणाले होते.
आज महाविकास आघाडीची तिसरी सभा होत आहे. पहिला सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. दुसरी सभा नागपूरमध्ये झाली. तर तिसरी सभा आज राज्याच्या राजधानीत होत आहे. या सभेसाठी आदित्य ठाकरे विशेष मेहनत घेत आहेत. ते बैठका घेत असल्याचंही राऊत म्हणाले होते. महाराष्ट्रातील जनमानसाचा निकाल कोणाच्या बाजून हे या सभेतून समजेल, असे राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास घाडीचे सर्वच नेते आज उपस्थित राहतील असंही राऊत म्हणाले होते.