Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे, निलंबनही रद्द; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्र सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहेत. तसंच डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेलं निलंबन आदेशही मागे घेतले आहेत.
Param Bir Singh : महाराष्ट्र सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहेत. तसंच डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेलं निलंबन आदेशही मागे घेतले आणि निलंबनाचा कालावधी ऑन ड्युटी असल्याचं मानलं जावं, असं आदेशात म्हटलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसंच भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. त्यानंतर परमबीर सिंह यांच्यावरही अनेक आरोप झाले, ज्यात त्यांचं निलंबन झालं होतं.
आदेशात काय म्हटलं आहे?
"ऑल इंडिया सर्व्हिसेस (शिस्त आणि अपील) नियम, 1969 च्या नियम 8 अंतर्गत परम बीर सिंह, IPS (निवृत्त) यांच्या विरुद्ध 02/12/2021 रोजी जारी केलेले आरोपपत्र मागे घेण्यात आले आहे आणि हे प्रकरण बंद करण्यात येत आहे, सरकारचे संयुक्त सचिव वेंकटेश भट यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.
सिंह यांचं निलंबन रद्द
त्यांच्या निलंबनाशी संबंधित अन्य आदेशात म्हटले आहे की, "अखिल भारतीय सेवा, नियम 1958 च्या तरतुदीनुसार, परम बीर सिंग IPS (निवृत्त) यांचे निलंबन या आदेशाद्वारे रद्द करण्यात आले आहे आणि 02/12/2021 ते 30/06/2022 पर्यंतच्या निलंबनाचा कालावधी हा सर्व उद्देशांसाठी ऑन ड्युटी कालावधी मानला जाईल."
मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हकालपट्टी
परमबीर सिंह यांच्यावर खंडणी, भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या अनेक प्रकरणांचा सामना करावा लागला होता आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणात कथित अनियमिततेमुळे त्यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवण्यात आले होते. परमबीर सिंह यांच्यावरील या आरोपांची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने पाच स्वतंत्र गुन्हे दाखल होते आणि हे गुन्हे यापूर्वी मुंबई पोलिसांनी नोंदवले होते.
परमबीर सिंह यांचे आरोप आणि अनिल देशमुख यांना जेलवारी
महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) कार्यकाळात अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. मुंबईचे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंह यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला (Sachin Vaze) दर आठवड्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. या आरोपांनंतर अनिल देशमुख यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याशिवाय अनिल देशमुख यांनाही भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन तुरुंगात जावं लागलं होतं.