Maharashtra Politics Shivsena: शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून शिंदे गटात शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी सामील होत आहेत. त्यातच उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे देखील शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकर यांनी सूचक ट्वीट केले आहे. मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीट करत आपण शिवसेनेतच असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.


मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यात शिवसेनेचे तीन खासदार आणि पाच आमदार शिंदे यांच्यासोबत येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्याशिवाय, शिवसेनेचे काही महत्त्वाचे नेतेदेखील शिंदेचे नेतृत्व स्वीकारणार असल्याचे म्हटले गेले होते. त्यानंतर मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाणार असल्याचे म्हटले जात होते. 


मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीट करत शिंदे गटातील प्रवेशाबाबत पूर्णविराम दिला आहे. मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीट करत ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू असून काल रात्री या कामाची पाहणी केली असल्याचे म्हटले. त्याशिवाय, शिवाजी पार्क येथील असलेल्या बंगाल क्लबच्या दुर्गोत्सवास भेट दिली व माँ दुर्गेचे दर्शन घेतले असल्याचे ट्वीट नार्वेकर यांनी केले. 


 






दरम्यान, शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. दसरा मेळाव्यासाठीच्या स्टेजची उभारणी सुरू करण्यात आली आहे. आज शिवसेना भवनमध्ये विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने जबाबदारीचे वाटप करण्यात येणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: