Mumbai News : मुंबईसह राज्यभरात जल्लोषात नवरात्री उत्सव (Navratri 2022)साजरा केला जात आहे. मात्र मुंबई पूर्व उपनगरातील मुलुंडमध्ये (Mulund) गरबा (Garba) खेळताना दुर्दैवी घटना घडली. गरबा खेळताना शनिवारी (1 ऑक्टोबर) रात्री हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू झाला. मुलुंडमधील कालिदास नाट्यगृह इथे भाजपतर्फे (BJP) आयोजित प्रेरणा रासमध्ये ही घटना घडली आहे.


ऋषभ लहरी मंगे भानुशाली असं मृत 27 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो डोंबिवलीचा रहिवासी होता. ऋषभ लहरी मंगे भानुशाली याने एमबीएचे शिक्षण घेतले होते. बोरिवलीतील एका खासगी कंपनीत ऋषभ कामाला होता. डोंबिवली पश्चिममध्ये तो आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. घरातला एकटा कमवणारा व्यक्ती होता. पण काळाने घाला घातल्याने त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. 


नवरात्री उत्सवात इतरांप्रमाणे तो देखील कुटुंबियांसोबत मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात भाजप नेते मनोज कोटक आयोजित गरबा खेळण्यासाठी आला होता. परंतु गरबा खेळत असतानाच त्याच्या छातीत दुखू लागलं. अॅसिडिटी झाल्याचं समजून कुटुंबियांनी त्याला थंड पेय पिण्यास दिलं. परंतु तरीही वेदना कमी न झाल्याने उपस्थितांच्या मदतीने त्याला तातडीने मुलुंडच्या आदिती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केलं.


ऋषभच्या मृत्यूमुळे तरुणांमधील हृदविकाराच्या झटक्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहेत. यापूर्वी मैदानावर क्रिकेट खेळताना किंवा व्यायाम करताना तरुणांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होता. आता गरबा खेळताना तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे 


यंदा नवरात्रीत शेवटचे तीन दिवस रात्री 12 वाजेपर्यंत गरबा
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधात साजरा होणारा नवरात्रोत्सव यंदा धुमधडाक्यात साजरा होत आहे. यंदा राज्यातील जनतेला नवरात्रोत्सवाचा आनंद घेता यावा म्हणून शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला. शेवटचे तीन दिवस रात्री 12 पर्यंत गरबा खेळत खेळता येईल असं सरकारने जाहीर केलं. नवरात्री उत्सवात रात्री 12 वाजेपर्यंत गरबा खेळण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी केली जात होती, जी सरकारने मान्य केली. सरकारने शेवटचे फक्त दोन दिवस 12 पर्यंत गरबा खेळण्याची परवानगी दिली होती. मात्र सरकारने यात आणखी एक दिवसाची वाढ केली. आधी ही वेळ 10 वाजेपर्यंत होती. मात्र आता 12 वाजेपर्यंत सूट दिल्याने शनिवार, सोमवार आणि मंगळवार या तीन दिवशी अनेकांना गरबा खेळण्याचा आनंद घेता येणार आहे.