मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरचा काळ हा परीक्षेचा आहे. नेते सोडून जात आहेत, कार्यकर्तेही पाठ फिरवत आहेत. अशावेळी त्यांना गरज आहे ती नव्या ऊर्जेची. सध्या नवरात्रोत्सवाचे दिवस आहेत. अशावेळी पक्षाला नवं बळ देण्यासाठी आता स्त्रीशक्तीच सज्ज झालीय का अशी चर्चा सुरु झाली. याचं कारण म्हणजे रश्मी ठाकरे यांचा पक्षातील वाढता वावर. 


राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असताना रश्मी ठाकरेंची सार्वजनिक जीवनातील उपस्थिती गेल्या काही दिवसात वाढलेली दिसत आहे. त्या कार्यकर्त्यांना भेटत आहेत, त्यांच्यात मिसळत आहेत. महिला कार्यकर्त्याही त्यांच्या उपस्थितीने आनंदी आहेत. रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उपस्थिती लावली. त्यानंतर त्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी गेल्या, त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दसरा मेळावा तोंडावर असताना रश्मी ठाकरे यांनी शिवसेना भवनात उपस्थिती लावली. 


काहीच दिवसांपूर्वी राणा दाम्पत्याविरोधात शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी झालेल्या फायर आजींच्या भेटीलाही त्या उद्धव ठाकरे यांच्यासमवेत पोहोचल्या होत्या. इतकंच नव्हे तर अत्यंत आपुलकीने आजींना मिठी मारुन त्यांनी संवाद साधला होता.


एकनाथ शिंदेंसह अनेक मंत्री आणि नेत्यांनी मातोश्रीशी न होणारा संवाद हे कारण देत बंडाचं निशाण फडकवलं. तो शिवसेनेचा कनेक्ट जर खरंच तुटला असेल तर तो रश्मी ठाकरे जुळवतायत का असा सवाल उपस्थित होतोय. 


रश्मी ठाकरे यांची पक्षाला गरज का?


उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामुळे त्यांना जाहीर कार्यक्रमात उपस्थिती लावण्यात मर्यादा येत आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे एकटे पडण्याची शक्यता आहेत. निलम गोऱ्हे, किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे या शिवसेनेच्या महिला ब्रिगेडला त्यामुळे बळ मिळण्याची शक्यता आहे. रश्मी ठाकरे यांचे माहेर डोंबिवली आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मुंबई-ठाणे-डोंबिवलीचा शिवसेनेशी असलेला धागा जोडण्यासाठी मोलाची भूमिका त्या पार पाडू शकतात. 


या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रश्मी ठाकरे सक्रिय राजकारणाकडे पाऊल टाकतायत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. बाळासाहेबांची सूनबाई, उद्धव ठाकरेंना राजकारणाच्या काट्यांनी भरलेल्या वाटेत खंबीर साथ देणारी पत्नी, आदित्य आणि तेजसवर संस्कार करणारी आई अशी रश्मी ठाकरे यांची प्रतिमा आहे. त्या अनेकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत कार्यक्रमांना उपस्थित असतात, पण पडद्यामागेच. उद्धव ठाकरे व्यासपीठावर असले तरी रश्मी ठाकरे समोर प्रेक्षकांमध्येच बसून कार्यक्रमात उपस्थित राहणं पसंत करतात. त्याच रश्मी ठाकरे आता प्रेक्षकांच्या खुर्चीतून मंचावर उद्धव यांच्या शेजारी दिसणार का हे येणारा काळच ठरवेल.