Dasara Melava : शिवसेनेच्या (Shiv Sena) दसरा मेळाव्याला एकच दिवस शिल्लक आहे. या दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून (Thackeray Group) मुंबईतील (Mumbai) दादर, वरळी परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील या मेळाव्यासाठी शुभेच्छा देणारे बॅनर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मेळाव्यापूर्वी ठाकरे गटाकडून वातावरण निर्मिती केली जात असल्याचं चित्र आहे.


शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. तर शिंदे गटाचा वांद्रे कुर्ला संकुलात अर्थात बीकेसीमध्ये होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थासाठी दोन्ही गट आमनेसामने आले होते. हा वाद कोर्टातही पोहोचला होता. अखेर हायकोर्टाने ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. आता मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे.


दादर, प्रभादेवीमधील शिवसेनेच्या शाखांवर महत्त्वाची जबाबदारी 
दसरा मेळाव्याकरता शिवसेनेच्या शाखांमधली तयारी पूर्ण झाली आहे. विशेषत: दादर, प्रभादेवीमधील शिवसेनेच्या शाखांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवाजी पार्क परिसरात अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी शिवसेनेचे पदाधिकारीही घेणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनाही पदाधिकाऱ्यांकडून शांतता पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


काँग्रेस, राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला मदत
आपलाच दसरा मेळावा मोठा व्हावा यासाठी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रयत्न सुरु आहेत. दसरा मेळावा शिंदे गटापेक्षा मोठा व्हावा यासाठी आता महाविकास आघाडीती मित्रपक्ष असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील सरसावले आहेत. या मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे अप्रत्यक्षरीत्या ठाकरे गटाला मदत करणार असल्याची माहिती आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीचे बॅनर्स पाहायला मिळत आहेत. 


दोन्ही गटांकडून एसटीसह खासगी बस बुक
दसरा मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत येण्यासाठी एसटीसोबत मोठ्या प्रमाणावर खाजगी बस दोन्ही गटांकडून बुक करण्यात आल्या आहेत. परिणामी दसऱ्याच्या दिवशी मुंबईत मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटाकडून साडेतीन हजारच्या जवळपास खाजगी बसेस बुक करण्यात आले आहेत. शिवाय एसटी बसचा हा आकडा सुद्धा हजारांच्या जवळपास असल्याची माहिती आहे 


शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या मोकळ्या जागेवर पार्किंगची
बिकेसी मैदानावर होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या मोकळ्या जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यास मुंबई विद्यापीठानेच दिली परवानगी दिली असल्याचं समोर आला आहे. 28 सप्टेंबरला बीएमसी एच इस्ट वॉर्डकडून मुंबई विद्यापीठाला कॅम्पसमधील मोकळी जागा मिळावी अशी विनंती करण्यात आली होती. बीएमसीच्या या मागणीला परवानगी देत मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांनी परवानगी दिला असल्याचं पत्र बीएमसीला पाठवले
मात्र, परवानगी देत असताना काही अटी शर्ती सुद्धा यामध्ये टाकण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या दैनंदिनी कारभारात अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. शिवाय, विद्यार्थी पालकांना कुठलाही त्रास होणार नाही, विद्यापीठाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी अस पत्रात सांगण्यात आले आहे.