![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Andheri East Bypoll: अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध? भाजपच्या गोटात हालचाली, पण मुरजी पटेल तर 'नॉट रिचेबल'
Andheri East Bypoll: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून उमेदवार घेण्याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू असताना दुसरीकडे उमेदवार मुरजी पटेल नॉट रिचबेल असल्याची माहिती समोर आली आहे.
![Andheri East Bypoll: अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध? भाजपच्या गोटात हालचाली, पण मुरजी पटेल तर 'नॉट रिचेबल' maharashtra politics BJP Mumbai likely announce withdraw candidate from andheri east bypoll but candidates muraji patel not reachable Andheri East Bypoll: अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध? भाजपच्या गोटात हालचाली, पण मुरजी पटेल तर 'नॉट रिचेबल'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/bb397a30ce9ece31b99ab40ded910dc21665989866745290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Andheri East Bypoll: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East bypoll) भाजप उमेदवार मागे घेणार का, याकडे अनेकांचे लक्ष असताना दुसरीकडे भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (BJP Candidate Muraji Patel) हे नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी दादर येथील कार्यालयात भाजपची बैठक सुरू झाली आहे. त्यामुळे मुरजी पटेल नेमकं आहेत कुठं? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
दादर येथील मुंबई कार्यालयामध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी (C.T.Ravi) यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे. या बैठकीत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar), आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, अमित साटम, राजहंस सिंह, कृपाशंकर सिंह, चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत अंधेरीतील पोटनिवडणुकीत उमेदवार कायम ठेवायचा की माघार घ्यायची याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुरजी पटेल आहेत कुठं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरजी पटेल हे सध्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाकडे त्यांचेही लक्ष लागले आहे. मुरजी पटेल यांच्याकडून पोटनिवडणुकीसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर त्यांनी याआधीच भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे भाजपने माघार घेण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना मोठा धक्का असणार आहे. पटेल यांनी मागील काही वर्षात या मतदारसंघात पकड जमवली आहे. मुरजी पटेल आणि त्यांची पत्नी मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झाले होते. मात्र, बनावट जात प्रमाणपत्रामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले होते. बांधकाम व्यावसायिक असलेले पटेल यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून अंधेरी पूर्वमध्ये आपली पकड मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक चुरशीची होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ऋतुजा लटके यांच्याकडून प्रचारावर भर
एकीकडे मुरजी पटेल नॉटरिचेबल असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्याकडून प्रचारावर जोर देण्यात येत आहे. ऋतुजा लटके यांच्या मतदारसंघात पदयात्रा सुरू असून मतदारांना आवाहन करत आहेत. भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली तरी नोंदणीकृत नसलेले आणि इतर अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून प्रचारावर भर देण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)