आश्रमशाळेतील विद्यार्थिनी होणार डॉक्टर, बदलापूरच्या शबाना शेखचा 'एमबीबीएस'ला प्रवेश
बदलापूरच्या आश्रमशाळेत राहून लहानाची मोठी झालेल्या शबाना शेखनं नुकताच वैद्यकीय शिक्षणासाठी एमबीबीएसला प्रवेश मिळवला आहे.
मुंबई : नाम शबाना हा तापसी पन्नूचा चित्रपट तुम्हाला आठवतो. त्या चित्रपटाची आठवण करण्याचं कारण म्हणजे बदलापूरची एक तरुणी आता तिचं शबाना हे नाव आणखी अभिमानानं मिरवणार आहे. बदलापूरच्या आश्रमशाळेत राहून लहानाची मोठी झालेल्या शबाना शेखनं नुकताच वैद्यकीय शिक्षणासाठी एमबीबीएसला प्रवेश मिळवला आहे. शबानाच्या या यशाबद्दल ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तिच्या गौरव सोहळ्याचं आयोजन केलं होतं.
शबाना शेख ही तरुणी बदलापूरच्या बॉम्बे टीन चॅलेंज या संस्थेच्या आश्रमशाळेत राहते. ती चार वर्षांची असताना या संस्थेच्या स्वयंसेवकांना मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये सापडली होती. तेव्हापासूनच ती आश्रमशाळेत वास्तव्याला आहे. याच आश्रमशाळेत राहून शबानानं बदलापूरच्या आयईएस कात्रप विद्यालयातून दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. पुढे अंबरनाथच्या साऊथ इंडियन कॉलेजमधून ती विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाली. त्यानंतर तिनं 'नीट' ही प्रवेशपरीक्षा देऊन जिद्दीनं एमबीबीएसलाही प्रवेश मिळवला. शबानाला औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. यासाठी ठाणे जिल्हा महिला बालकल्याण विभागानं तिला अनाथ असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. तिच्या या यशानंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तिचा विशेष सत्कार केला. तसंच पुढे काहीही मदत लागली, तर हक्काने सांग, आम्ही मदत करू, असं म्हणत शिक्षणाचा फायदा समाजासाठी होईल, असं ध्येय ठेवण्याचा संदेश जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी शबानाला दिला. यानंतर शबानानं सर्वांचे आभार मानलेत.
शबाना ज्या बॉम्बे टीन चॅलेंज संस्थेच्या आश्रमशाळेत राहून शिकली, त्या संस्थेनं शबानाला मोठं होऊन काय व्हायचंय, या दृष्टीने आधीपासूनच तयारी केली होती. आता तिच्या इच्छेनुसार एमबीबीएसला प्रवेश मिळाल्यानंतरही तिच्या शिक्षणाची सर्व प्रकारची आर्थिक तरतूद या संस्थेनं करून ठेवली आहे. त्यामुळं शबानाला कोणतंही टेन्शन न घेता अभ्यास पूर्ण करता येणार आहे.
हे ही वाचा....
Success Story : लहानपणीच आई- वडिलांचे छत्र हरपले; तरीही कठीण परिस्थितीत गाठले यशाचे शिखर
Success Story : मुलींनी आव्हाने स्विकारून सशस्त्र दलात यावे, मुलींमध्ये देशात प्रथम आलेल्या भावना यादवचे आवाहन
हम किसी से कम नहीं! आदिवासी पाड्यावरील शाळकरी मुलं म्हणताहेत चक्क आठशे तेराचे पाढे! वर्षभर भरते शाळा...