Booster Dose : मुंबईत आजपासून मोफत मिळणार बूस्टर डोस, कोणाला घेता येईल हा डोस? महापालिका प्रशासनाने सांगितले..
Booster Dose : देशात 75 दिवसांसाठी 'कोविड लस अमृत महोत्सव' राबविण्यात येणार आहे. मुंबई महानगरात देखील आजपासून हा महोत्सव सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर राबविला जाणार आहे.
Mumbai News : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशात 75 दिवसांसाठी 'कोविड लस अमृत महोत्सव' राबविण्यात येणार आहे. मुंबई महानगरात देखील आजपासून हा महोत्सव सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर (Covid Booster Dose) राबविला जाणार आहे.
कोणाला घेता येईल हा डोस?
वय वर्षे 18 वरील पात्र लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिने अथवा 26 आठवडे पूर्ण झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक मात्रा (Booster Dose) विनामूल्य दिली जाणार आहे. कोविड लस अमृत महोत्सवाचा लाभ घेऊन संबंधित पात्र मुंबईकर नागरिकांनी कोविड लसीचा हा डोस घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं केलंय.
एकूण 229 कोविड लसीकरण केंद्रं सध्या कार्यान्वित
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक 16 जानेवारी 2021 पासून कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु आहे. सुरूवातील प्राधान्य गटांचे व त्यानंतर दिनांक 1 मे 2021 पासून 18 वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी मुंबईत महानगरपालिका व शासकीय रुग्णालयात 104 तर खासगी रुग्णालयात 125 अशी एकूण 229 कोविड-19 लसीकरण केंद्रं सध्या कार्यान्वित आहेत. वय वर्षे 18 वरील लाभार्थी लक्षात घेता, मुंबईत आतापर्यंत 1 कोटी 03 लाख 15 हजार नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 93 लाख 56 हजार 541 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
बूस्टर डोस लसीकरणाची गती वाढविणे आवश्यक
कोविड-19 लसीचा बूस्टर डोस 10 जानेवारी 2022 पासून देण्यात येत आहे. यामध्ये फक्त आरोग्य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे (Frontline) कर्मचारी त्याचप्रमाणे 60 वर्षे किंवा त्यावरील नागरिक यांनाच महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांवर मोफत प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येत होती. तर 18 वर्षे वयावरील इतर सर्व पात्र नागरिकांना दिनांक 10 एप्रिल 2022 पासून खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लस घेण्यास परवानगी देण्यात आली. असे असले तरी, आतापर्यंत फक्त 9 लाख 92 हजार 177 एवढ्या लाभार्थ्यांनी प्रतिबंधात्मक मात्रा म्हणजेच बूस्टर डोस घेतला आहे. म्हणजेच बूस्टर डोस लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याची गती वाढविणे आवश्यक आहे.
'या' कालावधीत घेऊ शकता बूस्टर डोस
केंद्र सरकारने देशाच्या स्वातंत्र्यास 75 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून, 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीपर्यंत ‘कोविड लस अमृत महोत्सव’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. या ७५ दिवसांच्या कालावधीत वय वर्षे १८ वरील सर्व पात्र लाभार्थ्यांना कोविड लसीचा बूस्टर डोस मुंबईतील सर्व शासकीय व महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर विनामूल्य देण्यात येणार आहे. अर्थात, ज्या लाभार्थ्याने कोविड लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झालेले असतील, तेच लाभार्थी या बूस्टर डोससाठी पात्र असतील. दरम्यान, केंद्र सरकारतर्फे यासंदर्भात कोविन प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल आज 15 जुलै 2022 सकाळपर्यंत करण्यात येणार आहेत.