Maharashtra Mankhurd News : मुंबईच्या मानखुर्दमधील म्हाडा कॉलनीत काल रात्री जमावाकडून तोडफोड करण्यात आली. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, काल (रविवारी) 15-20 जणांच्या जमावानं परिसरातील गाड्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, मुंबई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. 


रविवारी रात्री मुंबईतील मानखुर्द परिसरातील म्हाडा कॉलनी परिसरात काही लोकांनी एकत्र येऊन तोडफोड करण्यास सुरुवात केली. रात्री 10 वाजता 15 ते 20 जणांच्या जमावानं एकत्र येऊन गाड्यांची तोडफोड केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आले. या घटनेबाबत माहिती देताना मुंबई पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक महादेव कोळी यांनी एबीपी माझाशी बातचित केली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, रात्री 10 ते 11 जणांचा जमाव परिसरात एकत्र आला आणि तोडफोड सुरु केली. एकूण किती गाड्यांची तोडफोड झाली याची माहिती पंचनाम्यानंतरच कळू शकेल. 


जमावाकडून तोडफोड का करण्यात आली, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नसल्याचंही यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं. तसेच, या संदर्भात पोलिसांचा तपास सुरु असून तपासाअंती जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना या घटनेसंदर्भातील कोणतेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करु नका आणि याबाबत कोणत्याही अफवा पसरवू नका, असं आवाहनही वरिष्ठ पोलीस निरिक्षक महादेव कोळी यांनी नागरिकांना केलं आहे. 


मानखुर्द भागातील रहिवासी असलेले अनिश पाशा, ज्यांचे या परिसरात दुकान आहे, त्यांनी एबीपी माझाला सांगितलं की, रात्री 10 च्या सुमारास 10 ते 15 जणांच्या जमावानं 20-25 वाहनांची तोडफोड केली. यामध्ये त्यांच्या वाहानांचंही नुकसना झाल्याचं त्यांनी सांगितलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :