MNS Bhonga At Shiv Sena Bhavan : मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक झालेल्या मनसेनं आज थेट शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठण केलं. आज रामनवमी उत्सव आहे. त्याचं औचित्य साधून मनसेनं शिवसेनेला डिवचलं.  हिंदुत्व विसरलेल्या शिवसेनेला जाग आणण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत मनसेनं थेट शिवसेनाभवनासमोरच हनुमान चालिसा पठण केलं. पोलिसांनी नंतर मनसैनिकांवर कारवाई केली आहे. 


यानंतर मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली आहे.  शिवसेना भवन ही काही मशीद नाही. ज्याच्या समोर हनुमान चालीसा लावली म्हणून कारवाई केली.  शिवसेना भवन हे हिंदूंचं पवित्र स्थळ आहे.  मग कारवाई का? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र मुख्यमंत्री असताना अशा पध्दतीने कारवाई होतेय हे दुर्दैव आहे.  ज्या टॅक्सीवर स्पीकर लावण्यात आले होते. ती टॅक्सी विभागात फिरवण्यात येणार होती. राम नवमी निमित्त हनुमान चालीसा लावणे गुन्हा आहे का? असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी केला आहे. 


दरम्यान या प्रकारानंतर शिवसेना भवन जवळील मनसेचा भोंगा पोलिसांनी जप्त केला आहे. सोबत यशवंत किल्लेदार आणि इतर मनसैनिकांना ताब्यात घेतलं आहे. सर्वांना शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात नेण्यात आलं असल्याची माहिती आहे.


काय म्हणाले होते राज ठाकरे?


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते.  मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानंतर मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते नाराज झाल्याचं दिसून आलं होतं. काही कार्यकर्त्यांनी राजीनामे देखील दिले होते. 



महत्त्वाच्या बातम्या:





LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha