Mumbai Fire: मुंबईत 21 मजली इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी तरुणीने खिडकीतून मारली उडी, पाहा व्हिडिओ
Mumbai Fire: मुंबईतील 21 मजली इमारतीला भीषण आग लागली. आगीतून वाचण्यासाठी एका तरुणीने खिडकीतून उडी मारली.
Mumbai Fire: मुंबई उपनगरातील मालाडमधील (Mumbai Malad Fire) एका 21 मजली इमारतीत भीषण आग लागली. या आगीत तीन घरे जळून खाक झाली. आगीतून वाचण्यासाठी एका तरुणीने खिडकीतून उडी मारली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी (Mumbai Fire Brigade) काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
मुंबईतील मालाड पश्चिम येथील जनकल्याण नगरमधील (Jankalyan Nagar Malad) मरीना एनक्लेव्ह या 21 मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे सहा ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग लागल्याचे समजाताच रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या एका घरातील तरुणीने खिडकीतून बाहेर उडी मारली. ही तरुणी बराच वेळ खिडकीच्या बाहेरील छज्जावर उभी होती. आगीच्या ज्वाळा वाढत असल्याने तिच्या सुटकेचे प्रयत्न सुरू होते. तिला शिडीच्या आधारे उतरवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, नाईलाजाने तिला उडी मारावी लागली. या तरुणीला कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.
#Mumbai#Fire in Marina enclave building,jankalyaan nagar of #Malad @MumbaiPolice @mybmc pic.twitter.com/qd1tO6lw82
— Indrajeet chaubey (@indrajeet8080) December 3, 2022
इमारतीच्या तिसरा मजल्यावर एका घरामध्ये आग लागली होती. अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या घटनास्थळावर दाखल झालेल्या. एका घराला लागलेल्या आगीची झळ बाजूच्या घरांना बसली. ही घरेदेखील जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास एक तासाचा कालावधी लागला. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर फायर कूलिंगचे काम अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले. सुदैवानी या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. ही आग नेमकी कशी लागली, याचा तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे.
दरम्यान, शुक्रवारी रात्री मुंबईतील शिवडी परिसरातील एका गोदामाला आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने घटना स्थळी दाखल झाले. या आगीत आठ जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोदामाला आग लागल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली.