(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai AC Local: ...तर, एक्स्प्रेस ट्रेन रोको आंदोलन करू; एसी लोकलच्या मुद्यावरून विधानसभेतील वातावरण गरम
Mumbai AC Local: कळवा स्थानकात रेल्वे प्रवाशांनी केलेल्या संतप्त आंदोलनाचा मुद्दा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत उपस्थित केला.
Mumbai AC Local : मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय एसी लोकलच्या मुद्यावरून विधानसभेत (Maharashtra Assembly Session) गरम चर्चा झाली. मध्य रेल्वेकडून एसी लोकलची (Central Railway AC Local) संख्या वाढवण्यात येत असल्याने नॉन एसी लोकलने जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. काही दिवसांपूर्वीच एसी लोकलच्या मुद्यावरून कळवा स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला होता. प्रवाशांच्या या उद्रेकाचे पडसाद विधानसभेत उमटले.
विधानसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, गुरुवारी आणि आज सकाळी कळवा रेल्वे स्थानकात अनेक प्रवासी एकत्र आले. या प्रवाशांचा मध्य रेल्वे प्रशासनाविरोधातील उद्रेक बाहेर पडत आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर एसी लोकलची संख्या वाढवण्यात येत आहे. एसी लोकलची तिकीट महाग आहे. कळवा आणि मुंब्रा स्थानकावर लोकल थांबवल्या जात नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या मार्गादरम्यान लोकल अपघातात 180 जणांचे बळी गेले असल्याकडे आव्हाड यांनी विधानसभेचे लक्ष वेधले.
मध्य रेल्वेकडून एसी लोकलची संख्या वाढवण्यात येत आहे. एसी लोकलमध्ये फारशी गर्दी नसते. तर, एसी लोकल येत असल्याने दुसऱ्या बाजूला प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. मध्य रेल्वेचे प्रवाशांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रेले रोको करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांच्या मागणीसाठी आम्ही एक्स्प्रेस, मेल रेल्वे रोखणार असल्याचा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
गुरुवारी प्रवाशांचे संतप्त आंदोलन
ठाणे-कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी गुरुवारी आंदोलन केले होते.संतप्त प्रवाशांनी काही वेळासाठी एसी लोकल (AC Train) रोखली होती. रेल्वे पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत प्रवाशांना हटवलं आणि लोकल वाहतूक पूर्ववत केली होती.
कळवा कारशेड इथून ज्या लोकल निघतात आणि पुढे ठाणे ते सीएसएमटी जातात. त्यात कळव्यातील अनेक प्रवासी बसून पुढे येतात, मात्र आता यापैकी एक लोकल, एसी लोकल म्हणून धावणार आहे. त्यामुळे कळव्यातील प्रवाशांना त्यात चढता आलं नाही, पाचवी-सहावी रेल्वे मार्गिका तयार करून देखील कळवा इथून लोकल सुटत नाही की, फास्ट लोकल थांबत नाही. त्यामुळे ठाणे प्रमाणे कळवा इथून देखील लोकल सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
एसी लोकलच्या फेऱ्यांच्या संख्येत वाढ
मध्य रेल्वेने गुरुवारपासून एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली होती. गुरुवारपासून एसी लोकलच्या 10 फेऱ्या वाढवण्यात आल्या. एसी लोकलच्या या फेऱ्या नॉन एसी लोकलच्या जागी चालवण्यात येत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील एकूण लोकल फेऱ्यांची संख्या कायम राहिली. तर, एसी लोकलच्या संख्येत वाढ होऊन 66 फेऱ्या झाल्यात. एसी लोकलच्या या वाढीव 10 फेऱ्यामधील सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रत्येकी एक लोकल फेरी वाढवण्यात आली.