(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'महा' चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर 6 ते 8 नोव्हेंबरदरम्या परिस्थिती पाहून शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पालघर जिल्ह्यातील एकूण 67 गावे समुद्रकिनारी असून आजपासून सर्व समुद्रकिनार्यावरील गावांमध्ये दवंडी पिटवण्यात येत आहे. गावांमध्ये तात्पुरता निवारा व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे येत्या 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान उत्तर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यालाही या 'महा' चक्रीवादळासह अतिवृष्टीचा तडाखा बसणार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 6 नोव्हेंबरपासून 8 नोव्हेंबरपर्यंत शाळा-कॉलेज परिस्थिती पाहून बंद ठेवण्याचे आदेश पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. मच्छिमारांनीदेखील दोन ते तीन दिवस मच्छिमारीसाठी समुद्रात जाऊ नये. जे मच्छिमार आधीच समुद्रात गेले असतील त्यांनी तातडीने किनाऱ्यावर यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असं आवाहनही जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी केलं आहे.
पालघर जिल्ह्यातील एकूण 67 गावे समुद्रकिनारी असून आजपासून सर्व समुद्रकिनार्यावरील गावांमध्ये दवंडी पिटवण्यात येत आहे. गावांमध्ये तात्पुरता निवारा व्यवस्था करण्यात आली असून 6 ते 8 तारखेपर्यन्त चक्रीवादळाचा प्रभाव नुसार शाळा कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येतील, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे
पालघरमध्ये एकूण 2774 मच्छिमारी बोटी असून, 288 बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या असून त्यापैकी 150 बोटी या रोज ये-जा करणाऱ्या असून त्या परतण्याची शक्यता आहे. मात्र 138 बोटी 10 नॉटिकल मैलपेक्षा आत मासेमारी गेल्या असून त्यांना समुद्रकिनारी परतण्याच्या सूचना देण्याचे प्रयत्न सुरु असून आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.