मुंबई : कोरोना काळात महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची दखल घेत आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. तसेच अर्थसंकल्पात महिलांसाठीही महत्वाच्या तरतूदी करण्यात आल्या. "शुभशकूनांचं तोरण तू, मांगल्याचं औक्षण तू, झिजतानाही दरवळणारं देवघरातील चंदन तू, स्त्री नसते वस्तू, ती नसते केवळ जननी, ती असते नवनिर्मितीची गाथा, जिथे आपण सर्वांनीची टेकावा माथा" असं म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठीच्या खास तरतूदी स्पष्ट केल्या.


स्त्रीमुळं घराला घरपण येतं, त्या घरावर तिचं नाव असावं, महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेचाच तो भाग आहे, असं म्हणत राज्यातील तमाम महिलांच्या अपेक्षेला न्याय देणारी राजमाता जिजाऊ गृहस्वामीनी योजनेची आज अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली. त्यामुळे यापुढे राज्यात कोणतंही कुटुंब घर विकत घेईल, त्या घराची नोंदणी गृहलक्ष्मीच्या नावावर करण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2021 पासून घर खरेदेची नोंदणी त्या कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरात सवलत देण्यात येणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी बोलताना स्पष्ट केलं.


तसेच पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आपलं राज्य हे महिला धोरणांच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राज्य आहे. मुलींच्या शिक्षणासाठी राज्यात अनेक पावलं उचलण्यात आली आहेत. आपल्या राज्यात मुलींचं बारावी पर्यंतच शिक्षण मोफत करण्यात आलं आहे. अशात आता राज्यातील सर्व ग्रामीण भागांतील विद्यार्थीनींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करुन देणारी राज्यव्यापी योजना जाहीर करत आहे. ही योजना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरु करण्यात येणार असू या योजनेसाठी शासनाकडून राज्य परिवहन मंडळाला पर्यावरण पूरक दीड हजार सीएनजी आणि हायब्रीड बस प्राधान्यानं उपलब्ध करुन देण्यात येतील. याव्यतिरिक्त मोठ्या शहरांतील महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी तेजस्विनी योजनेअंतर्गत आणखी महिला विशेष बस उपलब्ध करु देण्यात येणार आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :