Madhya Pradesh News : वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अनेकांना दंड भरावा लागतो. पण जर तुम्ही मध्यप्रदेशात राहत असाल आणि तुम्हाला अचानक मुंबई पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडल्यामुळं ई-चलान आलं तर? असाच प्रकार मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय दुचाकीस्वारासोबत झाला आहे. स्वप्नील नामदेव भोपाळमध्ये राहतो. त्याला सीट बेल्ट न घातल्याबद्दल मुंबई पोलिसांनी ई-चलान पाठवलं आहे. 


मध्य प्रदेशात राहणारा 27 वर्षीय स्वप्नील नामदेव, हा ट्रॅव्हल फोटोग्राफर आहे. त्यानं या प्रकाराबाबत बोलताना सांगितलं की, गेल्या दोन वर्षांपासून तो मुंबईत आलाच नाही. पण त्याला वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ई-चलान मुंबई पोलिसांनी पाठवलं आहे. तसेच, तो बाईक चालवतो. पण आलेल्या ई-चलानमध्ये कार चालवताना सीट बेल्ट न लावून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. 




स्वप्नीन नामदेवनं घडलेला प्रकार गांभीर्यानं घेत ट्विटरवर तक्रार केली. स्वप्नीलनं आपल्या ट्विटर हँडलवरुन मुंबई पोलिसांना टॅग करत आपली तक्रार सांगितली. तसेच, त्यासोबतच आपल्या बाईकचा फोटो आणि आलेल्या ई-चलानचा फोटोही जोडला. तसेच, त्याची बाईक मुंबईत नव्हतीच, असंही त्यानं सांगितलं. मला आलेले चलान हे सीट बेल्ट न लावल्यानं आलं आहे, पण बाईकवर सीट बेल्ट लावणं विचित्र होईल, असंही त्यानं सांगितलं. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून स्पष्टीकरण द्यावं, असं आवाहनही त्यानं केलं आहे. यापुर्वी मुंबई वाहतूक पोलिसांकडे चुकीचं ई-चलन पाठवण्याच्या अशा अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र यावेळी ई-चलान थेट भोपाळला पोहोचलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :