Nanded News : नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांचा 5 एप्रिल रोजी निवासस्थानासमोर गोळ्या झाडून अनोळखी हल्लेखोरांकडून हत्या करण्यात आली होती. ज्यात या गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथक (SIT) करत आहे. दरम्यान काल संजय बियाणी यांच्या घरी एक निनावी पत्र आले, ज्यावरून खळबळ उडाली, हे निनावी पत्र सरळ बियाणींच्या घरी धडकल्याने पोलिसांच्याही पायाखालची वाळू सरकली होती. दरम्यान संजय बियाणी हत्येसंदर्भात आलेले निनावी पत्र खोडसाळपणाने आले असल्याचे SIT च्या तपासात निष्पन्न झाले आहे.


निनावी हिंदी भाषेतील पत्र थेट बियाणींच्या घरी धडकल्याने खळबळ


काल संजय बियाणी यांच्या घरी एक निनावी पत्र आले, ज्यामध्ये "बहुत बड़ा दादा पांडूरंग येवले आनंदनगर मे रहेता है, आटाळा का रेती माफिया है. इसमे परभणी मे कोई बिल्डर नहीं रहेगा इसलीए बियाणी को ठोकनेका मनसुबा बनाया गया " वगैरे आशयाचे पाठवण्यात आले होते. ज्यामुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ माजली होती. तर हत्येनंतर आठ दिवस उलटल्या नंतर ही पोलीस गुन्हेगारापर्यंत पोहचू न शकल्याने, अगोदरच पोलिसांवर टीका होत होती. त्यातच हे निनावी पत्र सरळ बियाणींच्या घरी धडकल्याने पोलिसांच्याही पायाखालची वाळू सरकली होती. त्यानुसार हे पत्र बियाणी यांचे कुटुंबीयांनी विशेष तपास पथक (S.I.T.) यांचेकडे सुपूर्द केले आणि त्या अनुषंगाने तपास सुरू झाला.


.....म्हणून हे पत्र पाठविण्यात आले


या पत्राचा छडा नांदेड पोलिसांनी 24 तासात लावलाय.ज्यात पत्र लिहणारा आरोपी विठ्ठल संतराम सुर्यवंशी, वय 74 वर्ष, (राहणार आटाळा), तालुका धर्माबाद याने शेतीच्या वादातून पांडूरंग येवले या इसमास या गुन्ह्यात खोडसाळपणे गुंतविण्यासाठी हा पत्र व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या पत्राच्या आधारे पोलीसांकडून त्यांना अटक केली जावी, तसेच त्यांचे वैयक्तीक शेती विषयक वादामध्ये पांडूरंग येवले यास त्रास व्हावा या उद्देशाने परभणी येथून हे पत्र पाठविल्याचे निष्पन्न झालय. यात चौकशीअंती तक्रारदार पोलीस उप निरीक्षक प्रदिप भानुदास गौंड, पोलीस स्टेशन विमानतळ यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन विमानतळ येथे गु.र.नं. 130/2022 कलम 419. 182. 192 भा.द.वि. अन्यये व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आलीय. परंतु या पत्रा विषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास पोलिसांनी मात्र टाळलय.