Loksabha Result 4 June Dry Day: 4 जूनला मुंबईत संपूर्ण दिवस दारुबंदी नको; मतमोजणीच्या दिवशी फुल 'ड्राय डे'ला आव्हान, हायकोर्टात याचिका
Loksabha Result 4 June Dry Day: 4 जून 2024 रोजी मतदानाचा निकाल जाहिर होईपर्यंतच दारुबंदी असावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस जाहिर करण्यात आलेल्या 'ड्राय डे'ला (4 June Dry Day) आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. 4 जून 2024 रोजी मतदानाचा निकाल जाहिर होईपर्यंतच दारुबंदी असावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
मेसर्स इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने अॅड. विणा थडाणी व अॅड. विशाल थडाणी यांच्या मार्फत दोन स्वंतत्र याचिका केल्या आहेत. या याचिकांवर सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या याचिकेत हायकोर्ट काय आदेश देणार याकडे तळीरामांचे विशेष लक्ष लागले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण -
20 मे रोजी मुंबई आणि आसपासच्या प्रदेशात पार पडलेल्या मतदानाच्या दोन दिवसआधीपासूनच दारुची दुकाने बंद व बार ठेवण्याचा फतवा जिल्हाधिकारी यांनी काढला. त्यानुसार दारुची दुकाने व बार बंद होते. 4 जूनला मतमोजणी आहे. त्यादिवशी संपूर्ण दिवस दारुबंंदीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत. मात्र हे आदेश केवळ मतमोजणीपर्यंत असावेत, अशी विनंती जिल्हाधिकारी यांना करण्यात आली. त्यास जिल्हाधिकारी यांनी नकार दिला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत, त्यात बदल करता येणार नाही. असं उत्तर जिल्हाधिकारी यांनी याचिकाकर्त्यांना दिलंय. हा अन्याय असून मतदानाचा निकाल जाहिर होईपर्यंतच 'ड्राय डे' असावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
याचिकेतील मुद्दे -
- भारतीय व परदेशी दारु विकण्याचा अधिकृत परवाना असोसिएशनच्या सदस्यांकडे आहे.
- आम्ही रितसर सरकारला कर देतो. तरीही बार संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले जातात.
- शहरात बनावट दारु विक्री करणारे अनेकजण आहेत. त्यांच्यावर काहीच निर्बंध नसतात.
- ड्राय डेला बेकायदा दारु विक्री करणाऱ्यांचा धंदा तेजीत असतो. त्यांचा नफाही चांगला होता.
- रायगड जिल्ह्यात मतदानाचा निकाल जाहिर होईपर्यंतच दारु बंदी आहे. तसे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
- मुंबईतही अशाच प्रकारचे आदेश न्यायालयाने द्यावेत.