lalbaugcha raja ganpati visarjan : लालबागचा राजा तराफ्यावर विराजमान होताच लगोलग सुधीर साळवी माध्यमांसमोर, विसर्जनाबाबत दिली महत्त्वाची अपडेट
lalbaugcha raja ganpati visarjan : लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी विसर्जनाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोळी बांधवांशी झालेल्या चर्चेनुसार रात्री साडेदहा नंतर विसर्जन होईल, असं ते म्हणाले.

मुंबई :मुंबईतील लालबागचा राजा मंडळाच्या गणपतीच्या मूर्तीला तराफ्यावर विराजमान करण्यात यश आलं आहे. अत्याधुनिक तराफ्यावर लालबागचा राजा विराजमान झाल्यानंतर मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी संवाद साधला. रात्री साडे दहा ते अकरा नंतर विसर्जन होऊ शकतं, अशी माहिती सुधीर साळवी यांनी दिली. लालबागच्या राजावर करोडो भाविकांची श्रद्धा असल्यानं सकाळी एक प्रयत्न केला मात्र तो थांबवल्याचं ते म्हणाले. यावेळी साळवी यांनी माध्यमांचे आभार मानले.
सुधीर साळवी काय म्हणाले?
मुंबईत पडत असलेला पाऊस आणि अरबी समुद्राची भौगौलिक परिस्थिती पाहता यावेळी अरबी समुद्राला भरती लवकर आली. लालबागच्या राजाच्या गणपतीचं विसर्जन भरती आणि ओहोटीवर अवलंबून असते. आम्ही इथं पोहोचायच्या अगोदर भरती आली होती. आम्ही एक प्रयत्न करुन बघितला, लालबागचा राजा करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे त्यामुळं तो प्रयत्न थांबवला, असं सुधीर साळवी म्हणाले. ओहोटीच्या वेळी लालबागचा राजा तराफ्यावर घेतो. भरती आल्यावर तराफा अरबी समुद्रात जातो, त्यावेळी विसर्जन होतो. लालबागचा राजा मंडळाकडून उशिरा झालेल्या विसर्जनामुळं दिलगिरी व्यक्त करतो. मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांचं आभार मानतो. भरती लवकर आली आणि 10 ते 15 मिनिटं उशिरा पोहोचलो. माध्यमं आमच्या पाठिशी उभे राहिले त्यामुळं सर्वांचे आभार मानतो, असं सुधीर साळवी म्हणाले.
आम्हा कार्यकर्त्यांसाठी हा क्षण वेगळ्या पद्धतीचा आहे. दिलगिरी व्यक्त केली आहे. लालबागचा राजा करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असल्यानं आम्ही शास्त्रोक्त पद्धतीनं विसर्जन करणार आहोत. आता ही जी भरती आहे ते पाहता आणि कोळी बांधवांशी संवाद साधला, त्यानुसार रात्री साडे दहा ते अकरा वाजता विसर्जनासाठी लालबागचा राजा मार्गक्रमण करेल, असं सुधीर साळवी म्हणाले.
मुंबईत दोन दिवस तुफान पाऊस पडतोय आणि भरती लवकर आली. त्यामुळं विसर्जनाची वेळ जुळली नाही. यामुळं विसर्जन थांबवण्याचा निर्णय घेतला. आज रात्रीपर्यंत विसर्जन पार पाडू, असा शब्द सुधीर साळवी यांनी दिला.
मंडळासमोर नवं आव्हान
अत्याधुनिक तराफ्यावर लालबागच्या राज्याची मूर्ती चढवण्यात समुद्राला भरती आल्यानं पाणी वाढल्यानं सकाळपासून अडचणी येत होत्या. अखेर गणेशभक्तांच्या प्रार्थनेला यश आलं आहे, लालबागच्या राजाची मूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढवण्यात यश आलं आहे. समुद्राचं पाणी ओसरल्यानंतर मूर्ती तराफ्यावर चढवण्यात यश आलं आहे. मात्र, आता मंडळासमोर नवं आव्हान आहे.
अत्याधुनिक तराफा जिथं आहे तिथं सध्या समुद्राचं पाणी नाही. तराफ्याची हालचाल कशी करायची असं नवं आव्हान मंडळासमोर आहे. जेव्हा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल तेव्हा तराफ्याची हालचाल करता येणं शक्य होईल. सध्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत ओहोटीची वेळ असल्यानं तोपर्यंत वाट पाहावी लागेल.



















