मुंबई : महागड्या साड्या आणि मौल्यवान दागिन्यांची हौस भागवण्यासाठी चोरी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. आरती पाटील असे अटक केलेल्या या महिलेचे नाव आहे. हौस पूर्ण करण्यासाठी आरती पाटील ही महिला बाजारात गर्दीच्या ठिकाणी ब्लेडचा वापर करून खरेदीत व्यस्त असणाऱ्या महिलांची पर्स चोरी करत असे. 


पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने आरती पाटील आणि तिची साथीदार शालिनी पवार हिला अटक केली. या दोघींकडून नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून 15 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी भूषण दायमा, पोलीस निरीक्षक मोहन कळमकर, विनोद चन्ने, किशोर पाटील यांच्या पथकाने कल्याण डोंबिवलीमधील बाजारातील गर्दीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. यावेळी एका ठिकाणी महिला सीसीटीव्हीमध्ये चोरी करताना कैद झाली. दोन महिने पोलीस या महिलेच्या शोधात होते. ही महिला डोंबिवलीच्या टीएमटी कॉलनी परिसरात राहत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या महिलेच्या घरात जाऊन तिला बेड्या ठोकल्या. 


महगड्या साड्या, महागडे दागिने, मोठ-मोठ्या हॉटेलमध्ये जेवण करण्याची हौस करण्याठी चोरी करत असल्याची कबुली संशयीत महिलेने दिली आहे. ही महिला बाजारात गर्दीच्या ठिकाणी खरेदीसाठी आलेल्या महिलांवर नजर ठेवून त्यांच्या पर्सला ब्लेड मारून पर्स चोरी करून पळून जात असे.


कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरती पाटील हिला कल्याणमध्ये घडलेल्या एका गुन्ह्यात अटक केली. त्यानंतर कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. त्यानंतर महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक हुनमाणे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरतीला आणि तिला चोरीत साथ देणारी मैत्रीण शालिनी पवार या दोघींना अटक केली.


महत्वाच्या बातम्या