'पुस्तकातील ते एक पान काढून टाकावे अन् मग कितीही आवृत्या काढाव्या'; जितेंद्र आव्हाडांचा संताप
Jitendra Awhad on James Laine Controversial Book : राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केला आहे. लेन यांच्या पुस्तकातील प्रत्येक वाक्य शिवरायांच्या विरोधात आहे, असंही ते म्हणाले.
James Laine Controversial Book : छत्रपती शिवरायांबाबत जेम्स लेन यांनी लिहिलेल्या पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी माहिती पुरवल्याच्या आरोपावरून राज्यात राजकारण पुन्हा ढवळून निघत असताना आता या वादात स्वतः लेखक जेम्स लेननं स्पष्टीकरण दिलं आहे. यानंतर राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, पुस्तकातील ते एक पान काढून टाकावे आणि मग कितीही आवृत्या काढाव्यात. हे पान मी कधीच काढले नाही, कधीच वाचून दाखवले नाही, आज मात्र ते करावे लागले, असंही ते म्हणाले. आव्हाड म्हणाले की, जेम्स लेन आताच पुढे कसे आले? लेन यांच्या पुस्तकातील प्रत्येक वाक्य शिवरायांच्या विरोधात आहे, असंही ते म्हणाले.
आव्हाड यांनी म्हटलं की, जेम्स लेन यांना कोण मॅनेज करत हे याची कल्पना नाही. आधी त्या पुस्तकातील वादग्रस्त मजकूर वगळा आणि मग बोला, असं राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. आताच का जेम्स लेनला बाहेर काढलं गेलं. इतका गोंधळ झाला त्यावेळी लेनला कुठं गाडलं होतं. इतक्या वर्षानंतर तो मिळतो. महाराष्ट्राच्या अस्मितेबरोबर मस्ती करु नका, अन्यथा परिणाम गंभीर होतील, असंही आव्हाड यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.
जेम्स लेननं काय दावा केला
'शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या जेम्स लेन लिखित पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे हे माहितीचा स्त्रोत नव्हते अशी माहिती स्वतः जेम्स लेनने दिली आहे. इंडिया टुडेनं ई-मेलद्वारे त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत या पुस्तकाबाबत त्यांनी भाष्य केलं असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या पुस्तकात आपण कुठलाही ऐतिहासिक दावा केला नसून 'त्या' पुस्तकासाठी कुणीही माहिती पुरवली नाही, असा दावाच जेम्स लेननं केलाय. तसंच पुस्तक लिहीत असताना बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही जेम्स लेननं या मुलाखतीत सांगितलं आहे.
इतर संबंधित बातम्या
जेम्स लेन आणि पुस्तक वाद : महाराष्ट्रात आतापर्यंत काय काय घडलं?